वयोवृद्ध महिलेच्या घरी पंधरा लाखांची चोरी

वांद्रे येथील घटना; मोलकरणीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – वांद्रे येथे राहणार्‍या एका ७५ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेच्या घरी तिच्याच मोलकरणीने सुमारे पंधरा लाखांचे विविध सोन्याचे दागिने आणि विदेशी चलन घेऊन पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पळून गेलेल्या नम्रता घाग या मोलकरणीविरुद्ध वांद्रे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तिचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

बेहरॉज फरोख बारदोलीवाला ही वयोवृद्ध महिला तिच्या पतीसह जुळ्या बहिणीसोबत ५० वर्षांपासून वांद्रे येथील पारशी अग्यारीसमोरील टर्नर रोडच्या अली मंजील अपार्टमेंटमध्ये राहते. तिच्या बहिणीला पार्कसिंगचा आजार असून तिची देखभालीसह घरातील कामासाठी तिला एका मोलकरणीची गरज होती. त्यामुळे तिने केअर २४ या ब्युरोच्या मार्फत नम्रता हिला १३ सप्टेंबरपासून तिच्याा घरी कामावर ठेवले होते. बुधवारी ९ ऑक्टोंबरला नम्रताने तिच्याकडे दहा दिवसांची सुट्टी मागितली होती. तिचे महत्त्वाचे पर्सनल काम असल्याने तिने तिची सुट्टी मंजूर केली होती. त्यानंतर नम्रता ही तिच्या घरातून निघून गेली होती. शुक्रवारी ११ ऑक्टोंबरला बेहरॉज बारदोलीवाला हिने कपाटातील दागिन्यांची पाहणी केली असता तिला सुमारे पंधरा लाख रुपयांचे विविध सोन्याचे दागिने आणि अमेरिकन डॉलर चोरीस गेल्याचे दिसून आले.

ही चोरी नम्रता घाग हिने करुन सुट्टी घेऊन तिच्या घरातून पळून गेल्याची खात्री होताच तिने वांद्रे पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी बेहरॉज बारदोलीवाला यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नम्रताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ती पळून गेल्याने तिच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page