दिडशे कोटीच्या बाराशे आयसीयू बेडचे कंत्राट देण्याच्या आमिषाने गंडा
कामगार सल्लागारासह मंत्रालयातील चार बोगस वरिष्ठ अधिकार्याविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
30 जुलै 2025
मुंबई, – राज्यातील शासकीय हॉस्पिटलचे नूतनीकरण करण्यात येणार असून त्यासाठी दिडशे कोटीच्या बाराशे आयसीयू बेडची गरज आहे. या बेडचे कंत्राट तुमच्या कंपनीला मिळवून देतो असे सांगून एका व्यावसायिकाची पाचजणांच्या टोळीने सुमारे सहा कोटीची फसवणुक केल्याची धक्कादायक घटना वांद्रे परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी व्यावसायिकाच्या कामगार सल्लागारासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असल्याची बतावणी करणार्या चार बोगस अधिकारी अशा पाचजणांविरुद्ध वांद्रे पोलिसांनी भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नितीन गुप्ता, रमेश बनसोडे, बालाजी पवार, उद्धव भामरे आणि कौस्तुभ भामरे अशी या पाचजणांची नावे आहेत. या गुन्ह्यांत पाचही आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याने त्याचा तपास लवकरच आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तुफैल इद्रीस खान हे व्यावसायिक असून ते विद्याविहारचे रहिवाशी आहेत. त्यांचा लाकडी आणि मेटल फर्निचर तयार करण्याचा व्यवसाय असून त्यांच्या कंपनीचे नाव नोव्हेल डिझायनर डिस्प्ले सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय विद्याविहार असून दोन कारखाने पनवेलच्या रसायनी आणि रायगडच्या खालापूर परिसरात आहेत. त्यांच्याकडे नितीन गुप्ता हा कामगार सल्लागार म्हणून काम करतो. मार्च महिन्यांत त्यांना मंत्रालयातील काही वरिष्ठ अधिकार्यांसोबत एक मिटींग करायची होती, त्याची सर्व व्यवस्था नितीन गुप्ता याने वांद्रे येथील ताज लॅण्ड एन्ड हॉटेलमध्ये केली होती. तिथेच त्याने त्यांची ओळख रमेश बनसोडे, बालाजी पवार आणि उद्धव भामरे यांच्याशी करुन दिली होती. यावेळी त्याने रमेश बनसोडे हे राज्याचे माजी मंत्री, बालाजी पवार आरोग्यमंत्री तर उद्धव भामरे अन्न व औषध कार्यालयात ओएसडी म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले होते. त्यांच्या गळ्यात महाराष्ट्र शासनाचे ओळखपत्र असल्याने त्यांना त्यांच्यावर विश्वास बसला होता. शासनातर्फे राज्यातील सर्व शासकीय हॉस्पिटलमध्ये नूतनीकरण करण्यात येणार असून त्यासाठी दिडशे कोटी रुपयांचे बारा हजार आयसीयू मॅन्युअल बेड बनविण्याचा प्रस्ताव नितीन गुप्ताने इतर तिघांच्या मदतीने सादर केला होता.
आयसीयू मॅन्युअल बेड बनविण्याचे ऑर्डर तुमच्या कंपनीला मिळवून देतो असे सांगून त्यांनी त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या कंपनीसाठी ही मोठी संधी होती, त्यामुळे त्यांनी ते कंत्राट त्यांच्या कंपनीला मिळावे यासाठी विनंती केली होती. काही वेळानंतर बालाजी पवारने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर याचे नावाने सेव्ह केलेल्या क्रमांकावर कॉल केला आणि त्यांच्यातील चर्चेतील माहिती सांगितली. यावेळी त्याने तुफैल खान यांच्याशी नंतर बोलतो, तुम्ही आधी सर्व ठरवून घ्या असे सांगितले. त्यानंतर बालाजीने त्यांच्या प्लांटला भेट देऊन खात्री करुन त्यांना कंत्राट देण्याचे आश्वासन दिले होते. याच दरम्यान त्यांनी त्यांच्याकडे अठराशे आयसीयू बेड करण्यासाठी किती खर्च येईल याचे कोटेशन काढण्यास सांगितले. पंधरा दिवसांत शासन निर्णय होऊन जीआर निघेल. त्यानंतर आठ दिवसांत शासनातर्फे काम सुरु होईल. त्यासाठी त्यांना 35 टक्के रोख स्वरुपपात काही मंत्र्यांना द्यावी लागेल असे सांगितले. ही ऑर्डर मोठी असल्याने आताच त्याचा गाजावाजा करु नका, काम झाल्यानंतर पुढे काय ते बघू असे सांगितले. ऑर्डर तयार करण्यासाठी त्यांना शासकीय अधिकारी आणि कर्मचार्यांना सहा कोटी रुपये कमिशन म्हणून द्यावे लागणार होते, त्यामुळे त्यांना पैशांची व्यवस्था करण्यास सांगितले.
25 मार्चला त्यांची पुन्हा चर्चगेट येथील सम्राट हॉटेलमध्य एक मिटींग झाली होती. त्यात त्यांनी कौस्तुभ भामरे यांची आयएएस अधिकारी आणि उद्धव भामरे यांचे पूत्र म्हणून ओळख करुन दिली होती. या मिटींगमध्ये त्यांच्या युनिटला भेट देण्याबाबत ठरले होते. ठरल्याप्रमाणे एप्रिल महिन्यांत ते सर्वजण त्यांच्या कंपनीच्या रसायनी युनिटला व्हिजीट देण्यासाठी गेले होते. याच दरम्यान त्यांनी त्यांना बाराशे बेडचे शंभर कोटीचे कोटेशन दिले होते. तसेच आगाऊ 33 टक्के कॅश देण्याचे मान्य केले होते. त्यांचा कोटेशन आणि इतर बाबींसाठी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचार्यांना सहा कोटी द्यावे लागतील म्हणून त्याची आधी व्यवस्था करण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या परिचित लोकांकडून सहा कोटीची व्यवस्था केली होती. ही रक्कम त्यांनी नितीन गुप्तामार्फत संबंधित चौघांना दिली होती. ही रक्कम दिल्यानंतर पंधरा दिवसांत शासन निर्णय होऊन जीआर निघेल. त्यानंतर त्यांच्या कंपनीला बाराशे आयसीयू मॅन्युअल बेडचे कंत्राट देण्यात येईल असे सांगण्यात आले. यावेळी त्यांनी 33 टक्के म्हणजे तीस कोटी आरोग्यमंत्र्यांना द्यावे लागतील, त्यामुळे पुढील पैशांची व्यवस्था करण्यास सांगितले होते.
मात्र दोन महिने उलटूनही त्यांनी त्यांना शासन जीआर दाखविला नाही, त्यांना कंत्राट मिळवून दिले नाही. आरोग्यमंत्र्याकडून अद्याप मंजुरी मिळाली नाही असे सांगून ते त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. नंतर त्यांनी त्यांचे कॉल घेणे बंद केले होते. याच दरम्यान त्यांना बालाजी पवार यांना भष्ट्राचार विरोधी पथकाने अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत. त्यामुळे सध्या कोणालाही संपर्क साधू नका, नाहीतर तुमची कंपनीत गोत्यात येईल अशी भीती दाखविली. काही दिवसांनी त्यांना शासनाचा जीआर दाखविण्यात आला होता. त्यात त्यांच्या कंपनीला बाराशे बेडची ऑर्डर मिळाल्याचे नमूद करण्यात आले होते. हा जीआर त्यांनी त्यांच्या कायदेशीर सल्लागार यांच्याकडे दिला होता. त्यांनी शासनाच्या वेबसाईटवर त्याची शहानिशा केली असता त्यांच्याकडे असलेले शासन जीआर बोगस असल्याचेउघडकीस आले. ही माहिती ऐकून त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता.
राज्य शासनाकडून विविध शासकीय हॉस्पिटलमध्ये बाराशे आयसीयू मॅन्युअल बेडचे कंत्राट देतो असे सांगून या पाचजणांनी त्यांची सहा कोटीची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे संबंधित पाचही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर नितीन गुप्तासह रमेश बनसोडे, बालाजी पवार, उद्धव भामरे आणि कौस्तुभ भामरे यांच्याविरुद्ध तोतयागिरी करुन बोगस दस्तावेज सादर करुन सहा कोटीचा अपहार करुन तक्रारदार व्यावसायिकाची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत वांद्रे पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहे.