मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 मार्च 2025
मुंबई, – बेस्टमध्ये बसवाहक म्हणून कार्यरत असलेल्या अमती अशोक भोसले यांना शिवीगाळ करुन बेदम मारहाण करताना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन तरुणांना मालाड पोलिसांनी अटक केली. श्रवण रतन यादव आणि सोनू रविंद्र सरोज अशी या दोघांची नावे असून ते दोघेही कांदिवलीतील लालजीपाड्यातील रहिवाशी आहेत. अटकेनंतर या दोघांनाही नोटीस देऊन सोडून देण्यात आले.
ही घटना बुधवारी 12 मार्चला सायंकाळी सहा वाजता मालाड येथील मार्वे रोड, मीठ चौकी बसस्टॉपवर घडली. अमीत भोसले हे विरार येथील मनवेलपाडा परिसरात राहत असून बेस्टमध्ये वाहक म्हणून कामाला आहे. बुधवारी सायंकाळी ते त्यांच्या सहकारी बसचालकासोबत मार्वे रोडवरील मीठ चौकी बसस्टॉपच्या दिशेने जात होते. सिग्नलवर बस उभी असताना तिथे दोन तरुण आले आणि त्यांनी बसवर हाताने जोरात थाप मारत आरडाओरड सुरु केला होता. यावेळी अमीत भोसले यांनी त्यांना गोंधळ न करता बसमध्ये प्रवेश करा असे सांगितले. त्याचा राग आल्याने या दोन्ही तरुणांनी त्याला शिवीगाळ करुन बसमधून खाली उतर, तुला बघतो असे सांगून हाताने बेदम मारहाण केली. मारहाणीसह धक्काबुक्की करुन त्यांनी सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता.
ही माहिती मिळताच मालाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी शिवीगाळ करुन अमीत भोसले यांना मारहाण करणार्या दोन्ही तरुणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांची नावे श्रवण यादव आणि सोनू सरोज असल्याचे उघडकीस आले. ते दोघेही कांदिवलीतील लालजीपाडा, सरदार चाळीत राहतात. याप्रकरणी अमीत भोसले यांच्या तक्रारीवरुन या दोघांवर कर्तव्य बजाविणार्या शासकीय कर्मचार्याला शिवीगाळ तसेच मारहाण व धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच या दोघांनाही पोलिसांनी अटक केली होती. नंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले.