लग्नाच्या आमिषाने 29 वर्षांच्या तरुणीची ऑनलाईन फसवणुक
विविध कारण सांगून 4 लाख 62 हजारांना गंडा घातला
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 मार्च 2025
मुंबई, – लग्नाच्या आमिषाने एका 29 वर्षांच्या तरुणीची ऑनलाईन फसवणुक झाल्याचा प्रकार भांडुप परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी नबील मुनीर खान या तरुणाविरुद्ध भांडुप पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विविध कारण सांगून नबीनले तक्रारदार तरुणीला आतापर्यंत 4 लाख 62 हजाराचा गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले. त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
29 वर्षांची तक्रारदार तरुणी ही भांडुप येथे राहत असून ती ठाण्यातील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. तिच्या आई-वडिलांचे निधन झाले असून ती सध्या तिच्या भावासोबत राहते. लग्नासाठी तिने एका खाजगी मॅट्रीमोनी अॅपवर स्वतची माहिती अपलोड केली होती. 1 मार्च 2025 रोजी या अॅपवरुन तिची ओळख नबील खानशी झाली होती. तो वाशीच्या सिवुड्समध्ये राहत होता. त्याने तिला लग्नाविषयी विचारणा करुन तिला भेटण्यास बोलाविले होते. त्यानंतर त्याला भेटण्यासाठी भांडुप येथील एका हॉटेलमध्ये आली होती. तिथेच त्यांच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली होती. चर्चेदरम्यान त्याने स्वतची फास्टफुडची फे्ंरचायजी असून त्याच्या काकासोबत दक्षिण आफ्रिकेत मायनिंगचा व्यवसायात मदत करतो. त्याच्या वडिलांचा डोंगरी येथे ट्रॅव्हेल्सचा व्यवसाय असल्याचे सांगितले.
याच दरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली होती. ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. दोन दिवसांनी त्याने तिच्याकडे बाईक खरेदीसाठी पैशांची मागणी केली होती. त्याच्या व्यवसायाचे पैसे येणे बाकी असून ते पैसे आल्यानंतर तो तिला परत करेल असे सांगितले. त्यामुळे तिने त्याला एक लाख रुपये पाठविले होते. त्यानंतर तो विविध कारण सांगून तिच्याकडे सतत पैशांची मागणी करत ोता. त्याच्या व्यवसायाचे पेसे बँकेत अडकले आहे, मोबाईल आणि बाईकसह मामाच्या उपचाराचे बहाणा करुन त्याने त्याच्याकडू वेळोवेळी 3 लाख 87 हजार रुपये घेतले होते. इतकेच नव्हे तर तिच्या सोन्याची चैनमध्ये आणखीन सोने अॅड करुन तिला मोठी चैन घेतो असे सांगून तिच्याकडून 75 हजाराची सोनसाखळी घेतली होती.
अशा प्रकारे त्याने तिच्याकडून 4 लाख 62 हजार रुपये घेतले होते. मात्र ही रक्कम तिला परत केली नाही. लग्नाचे आमिष दाखवून तिची फसवणुक करण्याच्या उद्देशाने त्याने तिच्याकडून घेतलेल्या पैशांचा अपहार केला होता. हा प्रकार लक्षात येताच तिने भांडुप पोलिसांना घडलेला प्रकार सांगून नबील खान याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. पळून गेलेल्या आरोपीचा त्याच्या मोबाईलवरुन पोलिसांकडून शोध सुरु आहे.