मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 मे 2025
मुंबई, – भांडुप येथे तीन तृतीयंपथीच्या रुमचे कुलूप तोडून आत प्रवेश केलेल्या अज्ञात व्यक्तीने सुमारे सात लाखांचा मुद्देमाल चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यात सोन्याच्या दागिन्यांसह कॅशचा समावेश आहे. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्य आरोपीचा सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने शोध सुरु केला आहे.
33 वर्षांची तक्रारदार तृतीयपंथी असून ती तिच्या मैत्रिणीसोबत भांडुपच्या सोनापूर, दर्गा रोड, जानकी अम्मा चाळीत राहते. या चाळीत एकूण नऊ रुम असून तिथे सतरा तृतीयपंथी राहतात. मंगळवारी 29 एप्रिलला ती तिच्या मैत्रिणीसोबत ठाण्यातील कोर्टबंदर रोड, तीनहात नाका परिसरात भिक्षुकीसाठी गेली होती. यावेळी त्यांच्या घरी कोणीही नव्हते. सकाळी गेलेले ते सर्वजण सायंकाळी चार वाजता घरी आले होते. यावेळी तिला तिच्या घरातील कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले. तिने आत जाऊन पाहणी केली असता लोखंडी कपाटातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते.
लॉकरची पाहणी केल्यानंतर आतील 25 हजाराचे सोन्याचे दागिने तसेच त्यांच्या ग्रुपच्या 55 तृतीयपंथीचे भिसीचे साडेपाच लाख असे सात लाख पाच हजाराचा मुद्देमाल चोरी झाल्याचे दिसून आले. तसेच इतर दोन रुममध्ये चोरी झाली होती. तिच्या दोन्ही मैत्रिणीच्या घरातून अनुक्रमे साठ आणि सत्तर हजार असे एक लाख तीस हजाराची कॅश चोरी झाली होती. रुममध्ये कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन हा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते.
हा प्रकार उघडकीस येताच तिने भांडुप पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु आहे. दरम्यान बुधवारी उघडकीस आलेल्या या घरफोडीच्या घटनेने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.