मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – लिफ्ट रिपेरिंगच्या बहाण्याने शाळेत आलेल्या लिफ्ट मॅकेनिकने एका अल्पवयीन शाळकरी मुलीशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक भांडुप परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच लिफ्ट मॅकेनिक असलेल्या गोपाळ भोभानी गौडा या २७ वर्षांच्या आरोपीस भांडुप पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याचे बोलले जाते. भांडुपच्या एका नामांकित शाळेतील घटनेने शिक्षकासह पालकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
भांडुप परिसरात एका नामांकित शाळेत बळीत मुलगी शिकते. गुरुवारी ती नेहमीप्रमाणे शाळेत आली होती. याच शाळेत गोपाळ गौडा हा लिफ्ट मॅकेनिक म्हणून काम करतो. गुरुवारी तो लिफ्ट रिपेरिंगच्या कामासाठी आला होता. यावेळी त्याने बळीत मुलीशी अश्लील संभाषण करुन तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तिच्या पाठीवरुन हात फिरवून त्याने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. तसेच तो इतर लहान मुलींकडे एकसारखा टकटक करुन पाहत होता. घरी आल्यानंतर हा प्रकार या मुलीने तिच्या आईला सांगितला होता. त्यानंतर तिच्या आईने शाळेसह भांडुप पोलिसांना हा प्रकार सांगून संबंधित लिफ्ट मॅकेनिकवर कारवाई करण्याची विनंती केली होती. या महिलेच्या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच रात्री उशिरा आरोपीस पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर त्याला शुक्रवारी दुपारी विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. गोपाळ हा दिवा येथील जिवदानीनगरचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. शाळेत लिफ्ट रिपेरिंगसाठी आल्यानंतर त्याने बळीत मुलीशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. त्याने अशाच प्रकारे इतर दोन मुलींचा विनयभंग केल्याचे बोलले जाते.