क्लासच्या फीसाठी फोन करुन शारीरिक संबंधाची मागणी
अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी शिक्षाकाविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
20 मे 2025
मुंबई, – खाजगी क्लासेसला जाणार्या एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा तिच्याच शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना भांडुप परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी 28 वर्षांच्या आरोपी शिक्षकाविरुद्ध भांडुप पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. क्लासच्या फीच्या बहाण्याने त्याने बळीत मुलीला कॉल करुन तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी करुन तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.
36 वर्षांची तक्रारदार महिला ही भांडुप परिसरात राहत असून घरकाम करते. बळीत ही तिची सतरा वर्षांची मुलगी असून ती सध्या शिक्षण घेते. याच परिसरात खाजगी क्लास घेणार्या आरोपीकडे ती शिकवणीसाठी जात होती. 18 मेला रात्री साडेनऊ वाजता आरोपी शिक्षकाने बळीत मुलीला कॉल केला होता. तिच्याकडे क्लासच्या फीची मागणी करुन त्याने तिच्याकडे अश्लील संभाषण सुरु केले होते. काही वेळानंतर त्याने तिच्याकडे शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले होते. हा प्रकार तिने कोणालाही सांगू नये म्हणून त्याने तिची समाजात बदनामीची धमकी दिली होती.
या प्रकाराने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. घडलेला प्रकार तिने तिच्या आईला सांगताच त्यांनी भांडुप पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर बळीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.