सतत होणार्या भांडणाला कंटाळून पतीची पत्नीकडून हत्या
भांडुप येथील घटना; हत्येनंतर आरोपी पत्नीचे पलायन
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ जुलै २०२४
मुंबई, – सतत होणार्या भांडणाला कंटाळून जलाल मंडल या कामगाराची त्याच्याच पत्नीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना भांडुप परिसरात घडली. याप्रकरणी आरोपी पत्नी रोजिनाबिबी जलाल मंडल हिच्याविरुद्ध भांडुप पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हत्येनंतर रोजिनाबिबी पळून गेल्याने तिच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
गणेश बंडू दानवले हे नवी मुंबईतील घणसोलीचे रहिवाशी असून त्यांची अश्वमेध कन्स्ट्रक्टशन नावाची एक खाजगी कंपनी आहे. ही कंपनी इमारत बांधण्याचे मजुर पुरविण्याचे काम करते. गेल्या दोन वर्षांपासून भांडुपच्या कोकणनगर कालिमाता मंदिराजवळ एसआरएच्या पुर्नविकास इमारतीचे बांधकाम सुरु आहे. तिथेच त्यांना कामगार पुरविण्याचे कंत्राट मिळाले असून जवळपास वीसहून कामगार तिथे कामाला आहेत. गणेश भुवन इमारतीचे नऊ मजल्यापर्यंत बांधकाम झाले असून सध्या तिथे स्लॅब आणि प्लॉस्टरचे काम सुरु आहे. दिवसा काम करुन रात्रीच्या वेळेस त्यांचे कामगार तिथेच झोपत होते. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता ते बांधकाम साईटवर आले होते. कामगारांना सूचना देत असताना त्यांना तिसर्या मजल्यावर दुर्गधी येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांच्यासह इतर दोन ते तीन कामगार तिथे गेले होते. यावेळी त्यांना एका रुममध्ये जलाल मंडल या कामगाराचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. जलाल हा त्यांच्याकडे कामाला होता, गेल्या तीन दिवसांपासून तो कामावर आला नव्हता. त्याच्या गळ्याभोवती लाल कपडा गाठ मारुन गुंडालेला दिसला.
हा प्रकार संशयास्पद वाटताच गणेश दानवले यांनी ही माहिती भांडुप पोलिसांना दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मृतदेह पंचनामा करुन ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. त्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून त्यात जलालची गळा आवळून हत्या झाल्याचे उघडकीस आले होते. या घटनेनंतर पोलिसांनी तिथे काम करणार्या कामगारांची चौकशी सुरु केली होती. या चौकशीत १८ जुलैपासून जलाल कामावर आला नव्हता. त्याच्याविषयी कोणालाही काहीही माहित नव्हते. तो मूळचा कोलकाताचा रहिवाशी असून दहा दिवसांपूर्वी त्याची रोजिनाबिबी ही कोलकाता येथून मुंबईत आली होती. यावेळी त्यांच्यात नेहमीच खटके उडत असल्याचे काही कामगारांच्या निदर्शनास आले होते. मात्र पती-पत्नीमधील वाद असल्याने त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले होते. जलालनंतर रोजिनाबिबी हीदेखील अचानक गायब झाली होती. त्यामुळे तिनेच तिच्या पतीची गळा आवळून हत्या करुन तेथून पलायन केल्याचे उघडकीस आले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गणेश दानवले यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी रोजिना बिबीविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. ती पळून गेल्याने तिच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ती कोलकाताला पळून गेल्याची शक्यता असल्याने तिच्या अटकेसाठी एक टिम कोलकाता येथे पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.