भांडुप येथे 30 वर्षांच्या व्यक्तीने बंदुकीने स्वतवर गोळी झाडली

फसवणुकीमुळे मानसिक तणावातातून आत्महत्येचा प्रयत्न केला

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 एप्रिल 2025
मुंबई, – शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीवर दहा ते पन्नास टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची सुमारे 23 लाखांची फसवणुक करुन त्याला आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जय घुगल या आरोपीविरुद्ध भांडुप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मनोज भोसले असे या व्यक्तीचे नाव असून त्याने तीन दिवसांपूर्वी स्वतच्या बंदुकीने स्वतवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. जखमी झालेल्या मनोजवर फोर्टीज हॉस्पिटलमधील आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. जयने मनोजसह अनेकांना शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन त्यांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

शुभांगी मनोज भोसले ही महिला तिचे पती मनोज आणि तेरा वर्षांचा मुलगा भावेश याच्यासोबत भांडुप परिसरात राहते. तिचे पती माथाडी कामगार असून कळवा येथे काम करतात. ते पूर्वी म्हाडा कॉलनीत राहत होते. तिथे त्यांची जय घुगलशी ओळख झाली होती. गेल्या दोन वर्षांपासून ते एकमेकांच्या परिचित होते. जय हा घरातून शेअर मार्केटचे काम रत होता. त्याने मनोजला शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देता त्याला गुंतवणुकीवर दहा ते पन्नास टक्के व्याज देण्याचे आमिष दाखविले होते. या आमिषाला बळी पडून मनोजने जयकडे 23 लाखांची गुंतवणुक केली होती. त्यात मनोजला शुभांगीची आई छाया यादवने चार लाख तर दिर संतोष भोसले याने पाच लाख तर त्यांचे चौदा लाखांचा समावेश होता. ही रक्कम दिल्यानंतर जय आणि मनोज यांच्या एक करार झाला होता.

गुंतवणुक रक्कमेवर त्याने काही महिने व्याज दिला, मात्र नंतर त्याने व्याजाची रक्कम देणे बंद केले होते. त्याच्यासह इतर लोकांनी जयकडे मोठ्या प्रमाणात शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी पैसे दिले होते, त्यांनाही त्याने व्याजाची रक्कम देणे बंद केले होते. त्यामुळे अनेकांनी जयकडे त्यांच्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र तो विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्याकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच अनेकांनी भांडुप पोलीस ठाण्यात धाव घेऊन जयविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याची पोलिसांकडून शहानिशा सुरु होती. जयकडून फसवणुक झाल्याने मनोज हा सहा महिन्यांपासून मानसिक तणावात होता. तो नेहमीच घरी उशिरा येत होता. त्याला दारुचे व्यसन लागले होते. बुधवारी 16 एप्रिलला तो नेहमीप्रमाणे कळवा येथे कामासाठी गेला,

मात्र उशिरापर्यंत घरी आला नाही. त्यामुळे रात्री बारा वाजता तिने मनोजला कॉल केा. यावेळी त्याने काही वेळानंतर घरी येतो असे सांगून कॉल बंद केला. पहाटे चारपर्यंत मनोजने शुभांगीला चार ऑडिओ आणि दोन व्हिडीओ क्लिप पाठविले होते. त्यात मनोजने जयकडून फसवणुक झाल्याने तो मानसिक तणावात असल्याचे सांगून हा त्रास आता सहन होत नाही. त्यामुळे तुझ्यासह मुलांची काळजी घे असे सांगत होता. व्हिडीओची पाहणी केली असता ती जागा पंजाबी चाळ असल्याचे दिसून आले. त्यामुळे घाबरलेली शुभांगी ही तिथे गेली होती. यावेळी तिला मनोज एका पत्र्याच्या शेडजवळ बसल्याचे दिसून आले. त्याच्यात हातात बंदूक होती. शुंभागीसह तिचा भाऊ मुकेश यादव आणि मुलगा भावेशला पाहताच मनोजने मला जगायची इच्छा नाही.

आयुष्याचा कंटाळा आला आहे असे सांगून त्याने बंदुकीने स्वतवर गोळी झाडून घेतली. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्यांनी मनोजला तातडीने फोर्टीज हॉस्पिटमध्ये दाखल केले. तिथे त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले. ही माहिती मिळताच भांडुप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी शुभांगीच्या जबानीतून हा प्रकार उघडकीस आला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी जय घुगल याच्याविरुद्ध फसवणुकीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page