पुजार्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल
6 लाखांचे कर्ज; 16.89 लाखांची परतफेड करुनही धमकी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 जुलै 2025
मुंबई, – भांडुपच्या एका पुजार्याला दिलेल्या कर्जासाठी जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आले आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध भांडुप पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि सावकारी कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सुधांशू कुलदिप पांडे ऊर्फ नमन आणि पुष्पा हरिशंकर पांडे अशी या दोघांची नावे आहेत. विशेष म्हणजे व्यवसायासाठी सहा लाख रुपये घेतल्यानंतर पुजार्याने दोन्ही आरोपींना 16 लाख 89 हजार रुपये व्याजासहीत परत केले होते, तरीही सहा लाखांच्या उर्वरित रक्कमेसाठी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत तपास करुन दोषीवर सक्त कारवाईचे आदेश भांडुप पोलिसांना दिले आहेत.
सतीशकुमार विठ्ठल पुजारी हे भांडुपच्या व्हिलेज रोड, श्रीनाथ पांडे सोसायटीत राहत असून ते शनि मंदिरात पुजारी म्हणून काम करतात. तसेच त्यांचा कॅण्टीन व्यवसाय आहे. या व्यवसायात त्यांना प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे त्यांच्या मुलाने त्याच्या परिचित सुधांशू पांडेशी ओळख करुन दिली होती. त्याने त्यांना व्याजाने आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते. सप्टेंबर 2023 ते जानेवारी 2025 या कालावधीत सुधांशूने त्यांना टप्याटप्याने सहा लाख रुपये पंधरा टक्के व्याजदराने दिले होते. काही महिने व्याजाची रक्कम दिल्यानंतर त्यांना व्याजाची रक्कम देता आली नाही. त्यामुळे सुधांशू हा त्यांना कॉल करुन शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देत होता. या धमकीला कंटाळून सतीशकुमार पुजारी हे त्यांच्या कर्नाटक येथील उडपी, कटपाडी येथील गावी निघून गेले होते.
या घटनेनंतर त्यांच्या मुलाने त्याच्या मित्रांसह घरातील सोन्याचे दागिने गहाण ठेवून सप्टेंबर 2023 ते मे 2025 या कालावधीत 16 लाख 89 हजार 932 रुपये दिले होते. ही रक्कम सुधांशूसह त्याचे काका संदीप हरिशंकर पांडे यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली होती. मात्र ही रक्कम देऊनही तो त्यांच्याकडे आणखीन सहा लाखांची मागणी करत होता. यावेळी सतीशकुमार पुजारीने त्यांना त्याला आणखीन पैसे देणे शक्य नसल्याचे सांगितले. यावेळी त्याने त्यांना पुन्हा सहा लाख रुपये दिले नाहीतर जिवे मारण्याची धमकी दिली होती. सुधांशूकडून सतत जिवे मारण्याची धमकी मिळत असल्याने पुजारी कुटुंबिय प्रचंड भयभीत झाले होते. त्यांनी त्याचा मोबाईल ब्लॉक केला होता. त्यानंतर तो त्यांच्या मुलाला कॉल करुन धमकी देऊ लागला होता.
काही दिवसांपूर्वी सुधांशू व त्याची आजी पुष्पा पांडे हे दोघेही त्यांच्या घरी आले होते. या दोघांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी करुन त्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकाविण्याची धमकी दिली होती. या घटनेनंतर त्यांनी भांडुप पोलिसांना घडलेला प्रकार सांगून सुधांशू आणि त्याची आजी पुष्पा पांडे यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत या दोघांविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु असून त्यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.