आमदाराच्या स्विय सहाय्यकाच्या पत्नीची सायबर ठगांकडून फसवणुक
विदेशात गिफ्ट पाठविल्याचे सांगून घातला सव्वासहा लाखांना गंडा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
13 मार्च 2026
मुंबई, – आमदाराच्या स्विय सहाय्यकाच्या पत्नीची अज्ञात सायबर ठगांनी सुमारे सव्वासहा लाखांची फसवणुक केली आहे. सोशल मिडीयावर ओळख झालेल्या ठगाने वाढदिवसानिमित्त विदेशातून महागड्या वस्तूसह विदेशी चलन पाठवत असल्याची बतावणी करुन हा गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून अज्ञात सायबर ठगांचा शोध सुरु केला आहे.
तक्रारदादार महिला भांडुप येथे राहत असून तिचे पती एका विद्यमान आमदाराकडे स्विय सहाय्यक म्हणून काम करतात. गेल्या तीन वर्षांपूर्वी तिने इंटाग्रामवर एक खाते उघडले होते. याच खात्यात ती तिच्या मुलीचे व्हिडीओ अपलोड करते. 4 मार्चला तिला शेफ बेनडिक्ट या अज्ञात व्यक्तीची फे्ंरड रिक्वेस्ट आली होती. दोन दिवसांनी तिने ती रिक्वेस्ट फॉलो केली होती. त्यानंतर संबंधित व्यक्तीने तिला हाय पाठवून तुमची फॅमिली खूप छान आहे. कुठे राहतात याबाबत विचारणा केली होती. त्यामुळे तिने तिची माहिती सांगून त्याच्याविषयी विचारणा केली होती. त्याने तो युकेमध्ये राहत असून त्याला दोन भाऊ आहेत. त्याची आई शिक्षिका तर वडिल आर्किटेक्चर आहे. तसेच तो कुक म्हणून काम करतो असे सांगितले होते.
याच संभाषणादरम्यान त्याने तिच्यासह तिच्या पती आणि मुलीची, त्यांच्या वाढदिवसाची विचारणा केली होती. त्याने तिची आई तिला वाढदिवसानिमित्त एक गिफ्ट पाठविणार आहे. यावेळी तिने त्याला गिफ्टची गरज नसल्याचे सांगितले. दुसर्या दिवशी त्याने चॅटदरम्यान तिला पुन्हा गिफ्टविषयी विचारणा केली होती. आमच्या ख्रिश्चन धर्मात गिफ्ट दिले जातात. त्यामुळे तिला गिफ्ट घ्यावे लागेल असे सांगितले. तो तिच्यासोबत भावासारखा बोलत असल्याने तिने त्याला तिचा व्हॉटअप आणि घरचा पत्ता दिला होता. त्यानंतर त्याने तिला एक नेकलेस, महागडे वॉच, पर्स, परफ्युम आणि 40 हजार पौंड पाठवत असल्याचे सांगून तिला या गिफ्टच्या रिसिप्टवर वर्ल्ड लॉजिस्टिक कुरिअर सर्व्हिसचा एक फोटो पाठविला होता. त्याच्यावर तिला विश्वास बसला होता.
9 मार्चला तिला एका महिलेचा कॉल आला. तिने तिला तिच्यासाठी विदेशात एक पार्सल आले आहे. त्यासाठी तिला सत्तर हजार रुपये भरावे लागतील. मात्र तिने तिला काहीच प्रतिसाद दिला नाही. या कॉलनंतर तिने त्याला कॉल केला असता त्याने तो कॉल फ्रॉड नसून त्याचे पार्सल तिला पाठविण्यात आले आहे. याच दरम्यान तिला काही मॅसेज प्राप्त झाले होते. ते मॅसेज युके कस्टम विभागाचे होते. पार्सलमध्ये महागडे वस्तूसह विदेशी चलन असल्याने तिला पैसे भरल्याशिवाय पार्सल मिळणार नव्हते.
याच दरम्यान संबंधित व्यक्तींनी तिला वेगवेगळ्या कारणासाठी पैसे जमा करण्यास सांगितले होते. तिनेही त्यांनी दिलेल्या अकाऊंटमध्ये सव्वासहा लाख रुपये पाठवून दिले होते. मात्र ही रक्कम पाठवून तिला तिचे पार्सल मिळाले नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने घडलेला प्रकार भांडुप पोलिसांना सांगून संबंधित सायबर ठगांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.