लैगिंक अत्याचार करुन जबदस्तीने गर्भपात प्रवृत्त केले
ज्युनिअर आर्टिस्टच्या तक्रारीवरुन प्रियकराविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ सप्टेंबर २०२४
मुंबई, – लग्नाचे आमिष दाखवून ज्युनिअर आर्टिस्ट तरुणीवर लैगिंक अत्याचार करुन तिला जबदस्तीने गर्भपात करण्यास प्रवृत्त करण्यात आल्याचा प्रकार भांडुप परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी या ज्युनिअर आर्टिस्ट तरुणीच्या तक्रारीवरुन विजय नावाच्या प्रियकराविरुद्ध भांडुप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच विजय हा पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
३१ वर्षांची तक्रारदार तरुणी ही भांडुप येथे राहत असून ती टैलिव्हिजनमध्ये ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करते. तिचे आई-वडिल नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात राहतात. मे २०२४ रोजी ती तिच्या घराजवळील एका जिममध्ये जात होती. तिथेच तिची विजयशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. त्याने तिला तो इंजिनिअर म्हणून काम करत असल्याचे सांगितले. याच दरम्यान त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर केले होते. फोनसह सोशल मिडीयावर एकमेकांच्या संपर्कात असताना विजयने तिला प्रपोज केले होते. तिनेही त्याला होकार दिला होता. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. याच दरम्यान तो तिला भेटण्यासाठी तिच्या फ्लॅटमध्ये आला होता. तिथेच त्याने तिच्याशी जवळीक निर्माण करुन तिच्या मनाविरुद्ध लैगिंक अत्याचार केला होता. यावेळी त्याने तिला आपण लवकरच लग्न करु असे सांगितले होते. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तो तिच्यावर सतत लैगिंक अत्याचार करत होता.
ऑगस्ट महिन्यांत तिची मासिक पाळी आली नव्हती. त्यामुळे तिने प्रेगनंसी टेस्ट केली होती. त्यात तिला ती गरोदर असल्याचे समजले होते. हा प्रकार तिने विजयला सांगितला होता. यावेळी त्याने तिला गर्भपाताचा सल्ला देताना काही औषध आणून दिले होते. या गोळ्या खाल्याने तिला प्रचंड ब्लिडिंग सुरु झाले आणि त्यातच तिचा गर्भपात झाला होता. त्यानंतर तो तिला टाळण्याचा प्रयत्न करु लागला. त्याने तिला प्रतिसाद देणे बंद केले होते. तिचे दोन्ही मोबाईल ब्लॉक केले होते. तसेच तो त्याच्या घरातून निघून गेला होता. हा प्रकार लक्षात येताच तिने भांडुप पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी विजय पाटील याच्याविरुद्ध ६९, ८९ भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विजय हा पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.