चोरीसह घरफोडीच्या गुन्ह्यांतील सराईत टोळीचा पर्दाफाश
पाच रेकॉर्डवरील आरोपींना अटक करुन नऊ गुन्ह्यांची उकल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
15 ऑक्टोंबर 2025
ठाणे, – चोरीसह घरफोडीच्या एका रेकॉर्डवरील टोळीचा भिवंडी गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी पाच रेकॉर्डवरील आरोपींना पोलिसांनी अटक केली. जुनैद अहमद मोहम्मद हनीफ शहा, मोहम्मद आकिब मकबूल खान, हमजा सुजूद अहमद सिद्धीकी, शाहरुख इम्रान अन्सारी आणि शाकीर साजिद शेख अशी या पाचजणांची नावे आहेत. या आरोपींच्या अटकेने चोरीसह मोबाईल चोरी आणि घरफोडीच्या नऊ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे तीन लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गेल्या काही महिन्यांत भिवंडी परिसरात घरफोडीसह मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. या गुन्ह्यांतील आरोपींच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह भिवंडी गुन्हे शाखा-घटक दोनच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच भिवंडी परिसरात काही रेकॉर्डवरील गुन्हेगार चोरीच्या मुद्देमालाची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी, मिथुन भोईर, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पाटील, रामचंद्र जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनिल साळुंखे, सुधाकर चौधरी, पोलीस हवालदार प्रशांत राणे, निलेश बोरसे, सुदेश घाग, साबीर शेख, रंगनाथ पाटील, किशोर थोरात, राजेश गावडे, प्रकाश पाटील, शशिकांत यादव, वसंत मोरे, पोलीस शिपाई अमोल इंगळे, भावेश घरत, विजय कुंभार यांनी साध्या वेशात पाळत ठेवली होती.
ठरल्याप्रमाणे भिवंडी येथे आलेल्या जुनैद शहा, मोहम्मद आकिब, हमजा सिद्धीकी, शाहरुख अन्सारी आणि शाकीर शेख या पाचजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासात ते सर्वजण चोरीसह घरफोडी आणि मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्यांच्या अटकेने नारपोलीस, शांतीनगर, निजामपुरा, भिवंडी पोलीस ठाण्यात नऊ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या आरोपींकडून गुन्हंतील दोन बाईक, सात मोबाईल चार वायरचे बंडल, सोन्याचे दागिने, कॅश असा 3 लाख 12 हजार 423 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर या पाचजणांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती.