32 कोटीच्या एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी दोन आरोपींना अटक

आरोपींकडून सोळा किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 ऑगस्ट 2025
ठाणे, – मुंबई शहरात विक्रीसाठी घेऊन जाणार्‍या सुमारे 32 कोटीचा एमडी ड्रग्जचा साठा भिवंडी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी जप्त करुन दोन रेकॉर्डवरील आरोपींना अटक केली. तन्वीर अहमद कमर अहमद अन्सारी आणि महेश हिंदुराव देसाई अशी या दोघांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे सोळा किलो एमडी ड्रग्ज, तीस लाखांची बीएमडब्ल्यू कार, एक स्विफ्ट कार, तीन मोबाईल, कॅश असा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध मुंबईसह ठाणे, कोल्हापूर शहरात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहे. चालू वर्षांत इतक्या मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज पकडण्याची ठाणे पोलिसांची ही पहिलीच कारवाई आहे. त्यामुळे भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी कौतुक केले आहे.

गेल्या काही वर्षांत ठाणे शहरात एमडी ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. या घटनेची पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी गंभीर दखल घेत सर्वच पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखा आणि अ‍ॅण्टी नारकोटीक्स सेलला अशा ड्रग्ज तस्करांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. या आदेशानंतर ठाणे पोलिसांनी संबंधित ड्रग्ज तस्करांची माहिती त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. ही कारवाई सुरु असताना पूर्व दुतग्रती महामार्ग नाशिक-ठाणे वाहिनीवरील रांजनोली, भिवंडी बायपासजवळ काहीजण कोट्यवधी रुपयांच्या एमडी ड्रग्जची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस शिपाई अमोल इंगळे आणि पोलीस हवालदार प्रशांत राणे यांना मिळाली होती. ही माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी भिवंडी गुन्हे शाखेला संबंधित ड्रग्ज तस्कराविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी जनार्दन सोनावणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी, मिथुन भोईर, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पाटील, राजेश शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधाकर चौधरी, सुनिल साळुंखे, पोलीस हवालदार सुदेश घाग, प्रकाश पाटील, किशोर थोरात, साबीर शेख, वामन भोईर, प्रशांत राणे, पोलीस शिपाई अमोल इंगळे, भावेश घरत, विजय कुंभार, सर्फराज तडवी, रविंद्र साळुंखे, माया डोंगरे, महिला पोलीस हवालदार दक्षता सुतार, अनुष्का पाटील यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून गस्त सुरु केली होती.

ठरलयाप्रमाणे शनिवारी भिवंडी बायपासजवळील ओम साई फॅमिली ढाब्यासमोर दोन तरुण दोन वेगवेगळ्या कारमधून आले होते. या दोघांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांची नावे तन्वीर अन्सारी आणि महेश देसाई असल्याचे उघडकीस आले. यातील तन्वीर हा मुंब्रा येथील अमृतनगर, गरीब नवाज इमारतीमध्ये तर महेश हा मूळचा कोल्हापूरचा रहिवाशी असून सध्या विठ्ठलवाडी, जगे कंपाऊंड झोपडपट्टीत राहत होता. तन्वीरविरुद्ध मुंब्रा, डायघर, भायखळा पोलीस ठाण्यात तीन तर महेशविरुद्ध कोल्हापूरच्या आजरा पोलीस ठायात चार गंभीर गुन्हयांची नोंद आहे.

तपासात ते दोघेही मुंबई शहरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी जात होते. मात्र त्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी 31 लाख 84 हजार 80 हजार रुपयांचा 15 किलो 924 एमडी ड्रग्जचा साठा, पाच लाखांची एक डिझायर कार, तीस लाखांची बीएमडब्ल्यू कार, 22 हजाराचे तीन मोबाईल आणि कॅश असा 32 कोटी 20 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या दोघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्यांना पोलिसांनी अटक केली.

अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना बुधवार 13 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांना एमडी ड्रग्जचा साठा कोणी दिला. स्विफ्ट डिझायर कार तन्वीरच्या मालकीची असून बीएमडब्ल्यू कारचा मालक कोण आहे याचा तपास सुरु आहे. या गुन्ह्यांत त्यांचे इतर कोणी सहकारी आहेत, त्यांनी यापूर्वीही एमडी ड्रग्जची इतक्या मोठ्या प्रमाणात विक्री केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page