मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 सप्टेंबर 2025
मुंबई, – सोमवारी ज्वेलर्स शॉपला सुट्टी असल्याचा फायदा घेऊन शॉपच्या सेल्समनने लॉकरमधील सुमारे चार कोटीचे विविध सोन्याचे दागिने आणि सुमारे साडेतीन कॅश असा मुद्देमाल चोरी करुन पलायन केल्याची घटना परळ परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी जितू ऊर्फ जितेंद्र नवाराम चौधरी नावाच्या सेल्समनविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. जितू मूळचा राजस्थानच्या पालीचा रहिवाशी असल्याने त्याच्या अटकेसाठी भोईवाडा पोलिसांची एक टिम राजस्थानला गेल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मंगळवारी 9 सप्टेंबरला उघडकीस आलेल्या या चोरीच्या घटनेने स्थानिक ज्वेलर्स व्यापार्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
अरविंदकुमार दलिचंद संघवी हे 68 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार ज्वेलर्स व्यापारी असून ते परळ परिसरात राहतात. त्यांचा परळ येथील डॉ. बी. ए रोड, वर्धमान इमारतीमध्ये ए दलिचंद ज्वेलर्स नावाचे एक शॉप आहे. त्यांच्याच शॉपच्या बाजूल अनिल ज्वेलर्स नावाचे एक दुकान आहे. तिथेच जितू लालचंद्र चौधरी हा कामाला असून ते त्याला गेल्या नऊ महिन्यांपासून ओळखतात. त्यांच्या दुकानात एक कर्मचार्याची गरज असल्याने त्यांनी त्याला सांगितले होते. त्यानंतर त्याने त्यांची ओळख जितू नवाराम चौधरीशी करुन दिली होती. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी जितूला त्यांच्या ज्वेलर्स दुकानात कामासाठी ठेवले होते. तेव्हापासून तो त्यांच्याकडे सेल्समन म्हणून काम करत होता. दिवसभर काम करुन तो रात्रीच्या वेळेस शॉपच्या पोटमाळ्यावर झोपत होता.
एप्रिल 2025 रोजी जितू हा त्याच्या गावी निघून गेला होता, त्यामुळे त्यांनी त्याच्या जागी विजय देवासीला कामावर ठेवले होते. ऑगस्ट महिन्यांत विजय हा सुट्टीवर गेल्याने त्यांनी जितूला पुन्हा कामावर बोलावून घेतले होते. 7 सप्टेंबरला त्यांनी दुकानातील सर्व दागिने आणि कॅश लॉकरमध्ये ठेवले होते. त्यानंतर जितूची लॉकरची चावी त्यांचा भाऊ किरण संघवीकडे दिली होती. त्यानंतर ते दोघेही घरी निघून गेले होते. दोन दिवसांनी ते दुकानात गेले होते. यावेळी त्यांना लॉकर उघडा असल्याचे दिसून आले. लॉकरमधील विविध सोन्याचे दागिने, 3 लाख 53 हजार रुपयांची कॅश असा 4 कोटी 7 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी जितूला कॉल केला, मात्र त्याचा कॉल बंद येत होता.
चौकशीदरम्यान त्यांना जितू 8 सप्टेंबरला सायंकाळी चार वाजता एक बॅग घेऊन शॉपमधून निघून गेल्याचे समजले. 8 सप्टेंबरला ज्वेलर्स शॉप असल्याचा फायदा घेऊन जितूने बोगस चावीने लॉकर उघडून आतील विविध सोन्याचे दागिने आणि कॅश घेऊन पलायन केले होते. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी भोईवाडा पोलिसांना ही माहिती सांगून जितू चौधरीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
जितू हा त्याच्या राजस्थानातील मूळ गावी पळून गेल्याची शक्यता असल्याने त्याच्या अटकेसाठी भोईवाडा पोलिसांची एक टिम तिथे रवाना झाली आहे. चोरीच्या गुन्ह्यांत त्याला लवकरच चोरीच्या मुद्देमालासह अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.