बोगस गुणपत्रिका-प्रमाणपत्र सादर करुन मनपाची नोकरी मिळविली
32 वर्ष पालिकेची सेवा करणार्या समन्वयकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 फेब्रुवारी 2026
मुंबई, – बोगस गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र सादर करुन महानगरपालिकेची नोकरी मिळवून पालिका प्रशासनाची फसवणुक झाल्याचा धक्कादायक प्रकार 32 वर्षांनी उघडकीस आला आहे. याप्रकरणी महानगरपालिकेच्या समन्वयक एकनाथ गोविंद इंदुलकर यांच्याविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्यांना नोटीस बजाविण्यात आली असून त्यांची लवकरच चौकशी होणार आहे. एकनाथ इंदुलकर यांनी 32 वर्ष पालिकेची सेवा केली असून गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर आता गुन्हा दाखल झाला आहे.
शैलजा चंद्रकांत उंबरकर या गिरगाव येथे राहत असून महानगरपालिकेत कामाला आहे. सध्या त्यांची नियुक्ती कस्तुरबा हॉस्पिटलच्या कक्ष क्रमांक पाच, कुटुंबकल्याण व माता बाल संगोपन शहर शाखेत आहेत. तिथेच त्या मुख्य लिपीक म्हणून काम पाहतात. त्यांच्याकडे एकनाथ इंदुलकर हे समन्वयक म्हणून काम करत होते. नोकरी मिळविताना त्यांनी बोगस स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रमांचे गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र सादर करुन 1993 साली महानगरपालिकेत नोकरी मिळविली होती. हा प्रकार नंतर अलीकडेच डॉ. धीरज दिगंबर पगार यांच्या निदर्शनास आला होता. त्यानंतर त्यांनी त्यांचा तक्रार अर्ज शैलजा उंबरकर यांच्या कार्यालयात पाठवून त्याची शहानिशा करण्यास सांगितले होते.
या तक्रार अर्जाची संबंधित विभागाने गंभीर दखल घेत त्याचा तपास सुरु केला होता. त्यात एकनाथ इंदुलकर हे मनपाच्या ताडदेव येथील ताडवाडी आरोग्य केंद्रात समन्वयक म्हणून काम करत आहे. त्याने सादर केलेल्या गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र ऑल इंडिया इन्स्टिट्यू ऑफ लोकल सेल्फ गर्व्हरमेंट यांच्या संचालक कार्यालयात पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल अलीकडेच त्यांना प्राप्त झाला होता. त्यात एकनाथ इंदुलकर यांनी सादर केलेले प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका बोगस असल्याचे नमूद करण्यात आले होते. हा प्रकार उघडकीस येताच एफ/दक्षिण मनपाच्या कार्यकारी आरोग्य विभागाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.
11 डिसेंबर 2025 ही नोटीस त्यांना देण्यात आली होती. यावेळी त्यांच्याकडील कार्यालयीन ओळखपत्र ताब्यात घेण्यात आले होते. या निलंबनानंतर त्यांच्यावर विभागीय चौकशी सुरु करण्यातआली होती. या चौकशीचा अहवाल नंतर संबंधित वरिष्ठ अधिकार्यांना देण्यात आला होता. त्यात एकनाथ इंदुलकर यांनी मनपाची नोकरी मिळविण्यासाठी बोगस गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र सादर केले होते. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश शैलजा उंबरकर यांना देण्यात आले होते.
वरिष्ठांच्या आदेशानंतर शैलजा उंबरकर यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एकनाथ इंदुलकर यांच्याविरुद्ध बोगस गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र सादर करुन मनपाची नोकरी मिळवून पालिका प्रशासनाची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून याच गुन्ह्यांत त्यांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार आहे.