मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ जानेवारी २०२४
मुंबई, – एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करणार्या महिलेच्या घरी चोरी केल्याप्रकरणी श्रद्धा समीर घडवले या ३८ वर्षांच्या मोलकरणीला भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे. श्रद्धावर कपाटातील ड्राव्हरमधील ४ लाख ८० हजाराची कॅश चोरी केल्याचा आरोप असून अटकेनंतर तिला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये कामाला असताना श्रद्धाने तिथे चोरी केल्याचा आरोप होता. तिच्याकडून चोरीची काही कॅश हस्तगत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पूजा मेहुल सोलंकी ही महिला परळ येथील डॉ. ई बोर्जेस रोड, केईएम हॉस्पिटलसमोरील लोंढा प्रिमो अपार्टमेंटमध्ये राहत असून ती एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करते. त्यांच्याकडे श्रद्धा नावाची एक ३८ वर्षांची महिला मोलकरणी म्हणून काम करते. सकाळी साडेसात ते दुपारी अडीच वाजेपर्यंत तिच्या कामाची वेळ आहे. ती विरार येथे राहत असून तिच्यासह अपार्टमेंटच्या इतर ठिकाणीही श्रद्धा ही काम करते. २६ डिसेंबर २०२४ रोजी पूजा ही तिचे पती, मुलीसोबत तिच्या राजस्थानच्या सिरोही येथे राहणार्या आईकडे गेली होती. यावेळी घरात त्याची सासू निरंजना या एकट्याच राहत होता. १ जानेवारीला ते सर्वजण राजस्थानहून मुंबईत आले होते. ४ जानेवारीला तिने कपाटातील ड्राव्हरमधील पैशांसह दागिन्यांची पाहणी केली असता तिला ड्राव्हरमधील ४ लाख ८० हजार रुपयांची कॅश मिसिंग असल्याचे दिसून आले.
याबाबत तिने सासूला विचारणा केली असता तिला दागिन्याबाबत काहीच माहिती नव्हती. तिने श्रद्धाकडे विचारणा केल्यानंतर तिने उडवाउडवीचे उत्तरे देण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या घरी श्रद्धा वगळता इतर कोणीही बाहेरची व्यक्ती येत नव्हती. त्यामुळे तिला श्रद्धावर चोरीचा संशय होता. श्रद्धा ही पूर्वी वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये कामाला होता. तिथे कामाला असताना तिथेही चोरीच्या काही घटना घडल्या होत्या. याबाबत तिने क्लबचे चिफ ऑपेरेटिंग अधिकारी इवान डेव्हीड यांच्याशी चर्चा केली होती. श्रद्धाने तिथे चोरी केल्याचा आरोप होता. त्यामुळे तिनेच कपाटातील कॅश चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन तिने श्रद्धाविरुद्ध भोईवाडा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर तिच्याविरुद्घ पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच तिला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तिने ही कॅश चोरी केल्याची कबुली दिली होती. या कबुलीनंतर तिला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला शनिवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. श्रद्धाकडून पोलिसांनी चोरीची काही कॅश हस्तगत करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.