बस प्रवासादरम्यान पॉर्न व्हिडीओ दाखवून मुलीचा विनयभंग
विनयभंगासह पोक्सोच्या गुन्ह्यांत ५५ वर्षांच्या आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ डिसेंबर २०२४
मुंबई, – बस प्रवासादरम्यान पॉर्न व्हिडीओ दाखवून एका सात वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग झाल्याचा प्रकार परळ ब्रिज परिसरात घडला. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच ५५ वर्षांच्या आरोपी प्रवाशाला भोईवाडा पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते.
तक्रारदार महिला ही वडाळ्यातील ऍण्टॉप हिल परिसरात राहते. बळीत तिची सात वर्षांची मुलगी आहे. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता ती तिच्या मुलीसोबत बसने प्रवास करत होती. याच बसमध्ये आरोपी हादेखील प्रवास करत होता. ही बस परळ येथील डॉ. बी. ए रोड, परळ ब्रिजवरुन जात असताना आरोपीने त्याच्या मोबाईलवरुन मुलीला पॉर्न व्हिडीओ दाखविला होता. त्यानंतर त्याने तिचा हात पकडून तिला व्हिडीओ पाहण्यास प्रवृत्त केले होते. हा प्रकार तिच्या आईच्या लक्षात येताच तिने इतर प्रवाशांच्या मदतीने आरोपीला पकडून पोलिसांना ही माहिती दिली. ही माहिती मिळताच भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
या घटनेनंतर तक्रारदार महिला तिच्या मुलीसोबत पोलीस ठाण्यात आली होती. तिने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी प्रवाशाविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटक आरोपी हा वडाळा येथे राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. शुक्रवारी सायंकाळी तो कामावरुन घरी जात होता. यावेळी त्याने या मुलीला पाहून तिला मोबाईलमधील पॉर्न व्हिडीओ दाखवून तिचा विनयभंग केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून हा मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आला आहे. बस प्रवासादरम्यान एका सात वर्षांच्या मुलीला अश्लील पॉर्न व्हिडीओ दाखविल्याचा प्रकार घडल्याने इतर प्रवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.