मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० सप्टेंबर २०२४
मुंबई, – बाईक चोरीचा प्रयत्न फसल्याने आरोपीने डॉग ट्रेनरवर चाकूने प्राणघातक हल्ला केला.या हल्ल्यात कुणाल दिपक कुंडले हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या कानाला, बरगडी आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी गंभीर दुखापतीसह चोरीचा प्रयत्नाच्या गुन्ह्यांत सोनू चंद्रणा ऊर्फ सोनू या हल्लेखोर आरोपीस भोईवाडा पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कुणाल कुंडले हे प्रभादेवी येथे राहत असून डॉग ट्रेनर म्हणून काम करतात. बुधवारी दुपारी त्यांनी त्यांची बाईक दादर येथील दादासाहेब फाळके रोड, साधना हॉटेलसमोर पार्क केली होती. दुपारी साडेतीन वाजता एका अज्ञात व्यक्तीने त्यांची बाईक चोरीचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांनी हटकले असता त्याने त्यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर आरोपी तेथून पळून गेला होता. जखमी झालेल्या कुणाल यांना तातडीने केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरु आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या हल्लेखोराचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना सोनू चंद्रणा याला काही तासांत कुर्ला येथून पोलिसांनी अटक केली. तपासात सोनू हा मूळचा कर्नाटकच्या बंगलोरचा रहिवाशी आहे. तो चोरीच्या उद्देशाने दादर परिसरात आला होता. मात्र चोरीचा प्रयत्न फसल्याने त्याने कुणाल यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. सोनू हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या अटकेने रॉबरीसह वाहन चोरीच्या काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कदम यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक संतोष कोकरे, पंकज धाडगे, पोलीस उपनिरीक्षक अनिल भोंग, सचिन बोरसे, अमीत कदम, पोलीस हवालदार दयानंद साळुंखे, पोलीस नाईक विजर काटे, पोलीस शिपाई शंकर रणधीर, हेमंत सुळे यांनी केली.