ज्वेलरी शॉपमध्ये झालेल्या चार कोटीच्या चोरीचा पर्दाफाश
सेल्समनसह तिघांना चोरीच्या मुद्देमालासह राजस्थान येथून अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 सप्टेंबर 2025
मुंबई, – सप्टेंबर महिन्यांच्या दुसर्या आठवड्यात परळच्या ए दलिचंद ज्वेलर्स दुकानात झालेल्या चार कोटी सात लाख रुपयांच्या चोरीचा पर्दाफाश करण्यात भोईवाडा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना यश आले आहे. चोरीनंतर राजस्थानला पळून गेलेल्या आरोपी सेल्समनसह तिघांना पोलिसांनी अटक केली. जितू ऊर्फ जितेंद्र नवाराम चौधरी, कमलेश वाघाराम चौधरी आणि भरतकुमार ओटाराम चौधरी अशी या तिघांची नावे असून ते तिघेही मूळचे राजस्थानचे रहिवाशी आहेत. या तिघांकडून पोलिसांनी सव्वातीन कोटीचा मुद्देमाल जप्त केला असून उर्वरित मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अरविंदकुमार दलिचंद्र संघवी हे 68 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार ज्वेलर्स व्यापारी असून ते परळ परिसरात राहतात. त्यांच्या मालकीचे ए दलिचंद ज्वेलर्स नावाचे एक शॉप आहे. त्यांच्या दुकानाच्या बाजूला अनिल ज्वेलर्स नावाचे एक दुकान असून तिथे जितू चौधरी हा कामाला होता. त्यामुळे तो त्यांच्या परिचित होता. त्यांच्या दुकानात एका मुलाची गरज होती. त्यामुळे त्यांच्या एका कर्मचार्याने जितू चौधरीची शिफारस केली होती. ते दोघेही राजस्थानचे रहिवाशी असल्याने त्यांनी जितूला त्यांच्या ज्वेलरी शॉपमध्ये नोकरीवर ठेवले होते. जानेवारी 2025 पासून तो त्यांच्याकडे कामावर लागला होता. एप्रिल महिन्यांत तो त्याच्या गावी गेला होता.
गावाहून परत आल्यानंतर त्यांनी त्याला पुन्हा कामावर ठेवले होते. दिवसभर काम करुन तो रात्री ज्वेलर्स शॉपच्या पोटमाळ्यावर झोपत होता. सोमवारी 8 सप्टेंबरला त्यांच्या शॉपला सुट्टी होती. याच संधीचा फायदा घेऊन त्याने ज्वेलरी शॉपच्या लॉकरमधून सुमारे चार कोटीचे सोन्याचे विविध दागिने आणि 3 लाख 53 हजार रुपये घेऊन पलायन केले होते. 9 सप्टेंबरला तक्रारदार त्यांच्या दुकानात आले होते, यावेळी त्यांना चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे त्यांनी जितूला कॉल केला, मात्र त्याचा कॉल बंद येत होता. चौकशीदरम्यान त्यांना जितू 8 सप्टेंबरला सायंकाळी चार वाजता एक बॅग घेऊन शॉपमधून निघून गेल्याचे समजले.
हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी भोईवाडा पोलिसांना ही माहिती सांगून जितू चौधरीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त रागसुधा आर, राजतिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त धनश्याम पलंगे यांनी गंभीर दखल घेत भोईवाडा पोलिसांसह गुन्हे शाखेला संमातर तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ठाकूर, पोलीस निरीक्षक नितीन महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन बोरसे, अमीत कदम, ओंकार आडके, पोलीस हवालदार संतोष खेडेकर, पोलीस शिपाई अविनाश सुतार, पोलीस शिपाई प्रदीप राठोड, शंकर जोशी तसेच गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय बिराजदार, पोलीस हवालदार महाजन, पोलीस शिपाई जावीर, चव्हाण आदींचे एक पथक राजस्थानला पाठविण्यात आले हाते.
चोरीनंतर जितू हा राजस्थानला पळून गेल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर आरोपी सेल्समनचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना राजस्थानच्या पाली-बालीच्य सादडा गावातून स्थानिक पोलिसांच्या मदतीने जितू चौधरी व त्याचे दोन सहकारी कमलेश चौधरी आणि भरतकुमार चौधरी या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत जितूने त्यानेच इतर दोघांच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. या तिघांकडून पोलिसांकडून सत्तर टक्के चोरीचा मुद्देमाल जप्त केला असून उर्वरित मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार आहे. या कबुलीनंतर या तिघांनाही अटक करुन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते.