33 लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन केअरटेकर महिलेचे पलायन
पळून गेलेल्या महिलेविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 मे 2025
मुंबई, – परळ येथील एका ज्वेलर्स व्यापार्याच्या घरातून सुमारे 33 लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन त्यांच्याच केअर टेकर महिलेने पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सुनिता तुकाराम गोवंडे या महिलेविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. चोरीनंतर सुनिता ही अचानक कामावर येणे बंद झाल्याने तिच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली होती. सुनिताच्या चौकशीनंतरच या चोरीमागे तिचा सहभाग आहे का याचा खुलासा होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अशोक सरदारमल कोठारी हे परळच्या भारतमाता, अशोक टॉवरमध्ये राहतात. ते ज्वेलर्स व्यापारी असून त्यांचा लालबाग परिसरात मास्तर गोल्ड नावाचे एक ज्वेलर्स शॉप आहे. त्यांचा विवाहीत मुलगा आणि मुलगी हे डॉक्टर असून मुलगा स्वतंत्रपणे प्रॅक्ट्रीस करतो तर त्यांची मुलगी टाटा हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. टाटा हॉस्पिटल त्यांच्या घरापासून काही अंतरावर असल्याने त्यांची मुलगी अनेकदा त्यांच्याकडे राहत होती. तिला एक मुलगी असून तिच्यासाठी त्यांनी सुनिता गोवंडे या महिलेस केअरटेकर म्हणून कामावर ठेवले होते. गेल्या दिड वर्षांपासून ती त्यांच्या घरी कामासाठी येत होती. या कालावधीत सुनिताला त्यांच्या घरची आर्थिक स्थिती चांगली असल्याची माहिती झाली होती. नातीचा सांभाळ करताना ती फ्लॅटमधील प्रत्येक रुममध्ये जात होती. त्यामुळे तिला घरात कुठे काय वस्तू ठेवली आहे, कपाटासह लॉकरची चावी कुठे ठेवली जाते याबाबत तिला माहिती होती.
अशोक कोठारी यांचा होलसेलमध्ये सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय आहे, त्यांचा स्वतचा सोन्याचे दागिने बनविण्याचा कारखानाही आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी एकाच प्रकारच्या 50 सोनसाखळी बनवून घेतल्या होत्या. 33 लाख 44 हजार रुपयांच्या 378 ग्रॅम वजनाच्या या सोनसाखळी त्यांनी त्यांच्या कपाटातील लॉकरमध्ये ठेवले होते. 9 मेला सायंकाळी साडेसात वाजता सुनिता ही नेहमीप्रमाणे कामावरुन तिच्या घरी गेली होती. यावेळी ती खूप घाईघाईने जात होती. हा प्रकार अशोक कोठारी यांना संशयास्पद वाटला होता, मात्र नंतर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. दुसर्या सुनिता ही कामावर आली नाही. दिवसभर काम करुन अशोक कोठारी सायंकाळी त्यांच्या घरी आले. 11 मेला रविवार असल्याने कुटुंबातील सर्व सदस्य घरीच होते. यावेळी त्यांना सुनिता रविवारीही कामावर आली नसल्याचे समजले.
साोमवारी सकाळी दहा वाजता त्यांनी कपाटातून सोनसाखळी काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना सोनसाखळी कुठेच दिसल्या नाही. त्यांनी लॉकरसह कपाटातील सर्व ठिकाणी पाहणी केली, मात्र त्यांना कुठेच सोनसाखळी सापडली नाही. सुमारे 33 लाखांचे सोनसाखळी घरातून चोरीस गेल्या होत्या. विशेष म्हणजे या घटनेनंतर सुनिताने अचानक कामावर येणे बंद केले होते. त्यामुळे तिनेच ही चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन अशोक कोठारी यांनी तिच्याविरुद्ध भोईवाडा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर सुनिता गोवंडे हिच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून सुनिताची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.