फसवणुकीच्या गुन्ह्यांत भोजपुरी अभिनेत्याला अटक
साडेतीन लाखांच्या कर्जासाठी साडेतीन लाखांना गंडा घातला
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
1 जुलै 2025
मुंबई, – ऑनलाईन फसवणुकीप्रकरणी एका भोजपुरी आणि यूट्यूबरला दहिसर पोलिसांच्या एका विशेष पथकाने उत्तरप्रदेशातून अटक केली. दिपककुमार रामगोपाळ साहू असे या 38 वर्षीय अभिनेत्याचे नाव असून त्याच्यासह त्याच्या सहकार्यांनी एका बेस्टमधील चालकाची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. साडेतीन लाखांच्या कर्जासाठी साडेतीन लाखांना गंडा घातल्यानंतर तो उत्तरप्रदेशला पळून गेला होता. गुन्हा दाखल होताच अवघ्या महिन्याभरात त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
योगेश भगवान वाघमारे हे बोरिवली येथे राहत असून बेस्टमध्ये चालक म्हणून काम करतात. सध्या त्यांची पोस्टिंग पोईसर बस डेपोमध्ये आहे. अनेकदा कामावर जाताना त्यांना क्रेडिट कार्ड से कॅश लिजिए अशी जाहिरात वाचण्यात येत होती. या जाहिरातीवर एक मोबाईल होता. त्यामुळे त्यांनी तो मोबाईल क्रमांक सेव्ह करुन ठेवला होता. 13 मेला त्यांनी त्यांच्या मोबाईलवरुन संबंधित व्यक्तीला कॉल करुन त्याच्याकडे क्रेडिट कार्डवर कर्जाबाबत विचारणा केली होती. यावेळी दिलीपकुमार साहू नाव सांगणार्या व्यक्तीने त्यांना अडीच टक्के रक्कम कापून त्यांना कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्यांनी त्यांना वीस हजाराचे कर्ज दिले होते. त्यापैकी दोन टक्के कमिशन म्हणून त्याने स्वतकडे पाचशे रुपये ठेवून उर्वरित रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केले होते. त्यामुळे त्यांना दिलीपकुमारवर विश्वास निर्माण झाला होता.
काही दिवसांनी योगेश वाघमारे हे गावी गेले होते. यावेळी त्यांना गावच्या घराचे दुरुस्ती करायची होती, त्यासाठी त्यांना पुन्हा वैयक्तिक कर्जाची गरज होती. त्यामुळे त्यांनी दिलीपकुमारला संपर्क साधून त्याच्याकडे साडेतीन लाखांच्या कर्जाविषयी विचारणा केली होती. त्याने त्यांच्या क्रेडिट कार्डवरुन त्यांना कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी त्याने एक टक्का कमिशन घेण्याचे सांगितले होते. त्यास त्यांनी होकार दर्शविला होता. या कर्जासाठी त्याने त्यांच्या क्रेडिट कार्डसह ओटीपी घेतले होते. त्यातून त्याने काही ऑनलाईन व्यवहार करुन त्यांची साडेतीन लाखांची ऑनलाईन फसवणुक केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच योगेश वाघमारे यांनी दहिसर पोलिसांत तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दिलीपकुमारविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे आणि सायबर सेल पोलिसांनी संमातर तपास सुरु केला होता. तपासात आरोपी उत्तरप्रदेशात पळून गेल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यांनतर दहिसर पोलिसांच्या एका विशेष पथकाने उत्तरप्रदेशच्या कौशंबी परिसरातून दिपककुमार साहू याला अटक केली. या गुन्ह्यांत त्याचे इतर काही सहकार्यांची नावे समोर आली आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
दिपककुमार हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून तो भोजपुरी अभिनेता आणि यूट्यूबर आहे. त्याने काही भोजपुरी चित्रपटात काम केल्याचे बोलले जाते. त्याच्यासह त्याच्या सहकार्यांनी अनेकांची ऑनलाईन फसवणुक केली आहे. फसवणुकीच्या पैशांतून त्याने लग्नात काही पैसे खर्च केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर त्याला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.