नशा करण्यासाठी बाईक चोरी करणार्या सराईत आरोपीस अटक
बारा गुन्ह्यांची उकल करुन चौदा चोरीच्या बाईक हस्तगत
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ एप्रिल २०२४
मुंबई, – लोखंड चोरीच्या गुन्ह्यांत अटकेनंतर जामिनावर बाहेर येताच दिवसा रेकी करुन रात्रीच्या वेळेस बाईक चोरी करणार्या एका सराईत आरोपीस पवई पोलिसांनी अटक केली. विशाल हनुमंत कोळे असे या २६ वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्या अटकेने बाईक चोरीच्या बाराहून अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून चोरीच्या चौदा बाईक हस्तगत करण्यात आले आहे असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांनी सांगितले. विशालविरुद्ध एमआयडीसी आणि पवई पोलीस ठाण्यात आधीचे पाच गुन्हे दाखल असून त्यात आता बारा बाईक चोरीच्या गुन्ह्यांची भर पडली आहे.
यारमोहम्मद अब्दुल शेख हे पवई परिसरात राहत असून त्यांच्या मालकीची एक बाईक १ मार्च २०२४ रोजी अज्ञात व्यक्तीने चोरी केली होती. हा प्रकार सकाळी उघडकीस येताच त्यांनी पवई पोलिसांत तक्रार केली होती. गेल्या काही दिवसांत पवईसह आसपासच्या परिसरात बाईक चोरीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाल्याने त्याची पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त भारतकुमार सूर्यवंशी यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांना आरोपीच्या अटकेचे आदेश दिले होते. या आदेशानंतर जितेंद्र सोनावणे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक गणेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कांबळे, पोलीस हवालदार तानाजी टिळेकर, बाबू येडगे, आदित्य झेंडे, पोलीस शिपाई संदीप सुरवाडे, सूर्यकांत शेट्टी, रवी ठाकूर, चेंबूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार भास्कर गोडे, पोलीस शिपाई नितीन पाटील यांनी तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतल्यानंतर एका फुटेजमध्ये विशाल हा दिसून आला होता. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना तांत्रिक माहितीवरुन चेंबूर येथील आरसीएफ, माहुल गावात लपलेल्या विशाल कोळे याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी आणि पवई पोलीस ठाण्यात जबरी चोरीसह घरफोडीच्या पाच गुन्ह्यांची नोंद होती. चौकशीदरम्यान त्याने पवई येथून पाच, मेघवाडी, माटुंगा, वडाळा टी टी, आरसीएफ, चेंबूर, रफि अहमद किडवाई मार्ग, ऍण्टॉप हिल येथून प्रत्येकी एक असे सात बाईक चोरी केल्याची कबुली दिली.
त्याच्या अटकेने बारा बाईक चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. या गुन्ह्यांतील चौदाहून अधिक चोरीच्या बाईक नंतर पोलिसांनी हस्तगत केल्या. त्याच्याकडून हस्तगत केलेल्या जप्त केलेल्या तीन बाईकची माहिती काढण्याचे सुरु आहे. काही महिन्यांपूर्वी त्याला भंगार चोरीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली होती. काही दिवस जेलमध्ये राहिल्यानंतर तो जामिनावर बाहेर आला होता. बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा भंगार चोरी करु लागला. यावेळी भंगार चोरीसाठी तो दिवसा रेकी करुन रात्रीच्या वेळेस बाईक चोरी करु लागला होता. गेल्या काही महिन्यांत त्याने विविध परिसरातून रात्रीच्या वेळेस बाईक चोरी केल्या होत्या. या बाईकचा तो चोरीसाठी वापर करत होता. त्याला नशा करण्याचे व्यसन होते. भंगारसह बाईक चोरीच्या पैशांतनू तो नशा करत होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.