मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० नोव्हेंबर २०२४
मुंबई, – मौजमजेसाठी बाईक चोरी करणार्या एका रेकॉर्डवरील आरोपीस रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी अटक केली. हितेश नरेश माळजी असे या आरोपीचे नाव असून त्याच्या अटकेने बाईक चोरीच्या पाच गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीच्या सहा बाईक जप्त केल्या आहेत. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
१६ ऑक्टोंबरला तक्रारदाराची ऍक्टिव्हा बाईक वडाळा येथील कात्रक रोड, शांताराम इमारतीसमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरी केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी आरएके मार्ग पोलीस ठाण्यात बाईक चोरीची तक्रार केली होती. गेल्या काही दिवसांत शिवडी व वडाळा परिसरातून मोठ्या प्रमाणात बाईक चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यामुळे अशा बाईक चोरांच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश वरिष्ठांकडून सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले होते. या आदेशानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल पारसकर, पोलीस उपायुक्त रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त दिपक गावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, पोलीस निरीक्षक सलीम नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मोहिते, गोविंद खैरे, पोलीस उपनिरीक्षक टिपू सुल्तान शेख, पोलीस हवालदार पोटे, केकान, माळवे, कोळेकर, पोलीस शिपाई डांगे, म्हात्रे, देशमुख, आहेर, राणे यांनी अशा आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती.
परिसरातील जवळपास २२० हून अधिक सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपींची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. सीसीटिव्ही फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी चेंबूर येथून हितेशसह एका अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत हितेशनेच ती ऍक्टिव्हा बाईक चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्याने शिवडीसह वडाळा, आरसीएफ पोलीस ठाण्यातून इतर काही बाईक चोरी केल्याचे सांगितले. त्याच्या चौकशीतून आरएके मार्ग, भोईवाडा, वडाळा, आरसीएफ पोलीस ठाण्यातील बाईक चोरीच्या पाच गुन्ह्यांची उकल करण्यात आले होते. चोरीच्या सहा बाईक नंतर पोलिसांनी त्याच्या राहत्या घराजवळून ताब्यात घेतले होते. मौजमजेसाठी तो बाईक चोरी करत होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.