बाईक चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील आरोपीस अटक
अॅण्टॉप हिल-वडाळा टी टी हद्दीतून चोरी केलेले तीन बाईक जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – बाईक चोरीच्या गुन्ह्यांतील एका रेकॉर्डवरील आरोपीस वडाळा टी टी पोलिसांनी अटक केली. जैद मोहम्मद आलम खान असे या 25 वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचे तीन बाईक जप्त केल्या आहेत. या तिन्ही बाईक त्याने वडाळा ट्रक टर्मिनस आणि अॅण्टॉप हिल परिसरातून चोरी केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष आवळे यांनी सांगितले. जैद हा सराईत गुन्हेगार असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मोहम्मद अनीस खान हा तरुण त्याच्या कुटुंबियांसोबत वडाळा परिसरात राहते. त्याची मालकीची बाईक त्याने वडाळा ट्रक टर्मिनस रोड, वडाळा आरटीओ कार्यालयाजवळ पार्क केली होती. 6 ऑक्टोंबरला ही बाईक अज्ञात व्यक्तीने चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार मोहम्मद अनीसच्या लक्षात येताच त्याने वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांत बाईक चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी बाईक चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक् मनिष आवळे यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला आरोपीच्या अटकेचे आदेश दिले होते.
या आदेशांनतर या पथकाने परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केलीहोती. त्यातील एका फुटेजमध्ये जैद खान हा बाईक चोरी करत असल्याचे दिसून आले. जैद हा रेकॉर्डवरील जुना आरोपी असल्याने त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र धिवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माधवेंद्र येवले, पोलीस हवालदार गोसावी, कुटे, पोलीस शिपाई शेख, बटुळे यांनी तांत्रिक माहितीवरुन जैद खानला वडाळा येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
तो मुंबई सोडून पळून जाण्याचा प्रयत्नात होता, मात्र त्यापूर्वीच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने वडाळा टी टी आणि अॅण्टॉप हिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन बाईक चोरी केल्याची कबुली दिली होती. या तिन्ही बाईक पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्याच्या अटकेने बाईक चोरीच्या तिन्ही गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.