बाईक चोरीच्या गुन्ह्यांतील अल्पवयीन टोळीचा पर्दाफाश
मौजमजेसाठी आतापर्यंत सहा बाईक चोरी केल्याची कबुली
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
27 नोव्हेंबर 2025
मुंबई, – रेकी करुन बाईक चोरी करणार्या एका अल्पवयीन टोळीचा बांगुरनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी सोळा ते सतरा वयोगटातील दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या अटकेने सहा बाईक चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या सहापैकी पाच गुन्ह्यांतील चोरीच्या बाईक हस्तगत करण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या दोन्ही मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ते दोघेही मौजमजेसाठी बाईक चोरी करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
45 वर्षांचे रितेश मनोहरलाल शाह हे व्यापारी असून ते कांदिवलीतील महावीरनगर परिसरात राहतात. त्यांचा लाईटचा व्यवसाय असून त्यांच्या मालकीचे एक शॉप आहे. 20 नोव्हेंबरला ते मालाड येथील लिंक रोड, ऑरा हॉटेलजवळ आले होते. तिथेच त्यांनी त्यांची बाईक पार्क केलीद होती. ही बाईक अज्ञात व्यक्तीने चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बांगुरनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी बाईक चोरीच्या गुन्ह्यांची नोंद करुन पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता.
अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त संदीप जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश बागल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश रंधे, संजय सरोळकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय कदम, पोलीस हवालदार राजेंद्र गळवे, पोलीस शिपाई श्रीकांत हरगुडे, विशाल जाधव, पोलीस हवालदार भूषण भोगले, पोलीस शिपाई निशिकांत शिंदे, नितीन दळवी, मिथुन गावीत यांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध सुरु असतानाच तीन संशयित व्यक्ती तिथे दिसून आले होते. त्यामुळे या तिन्ही संशयितांची माहिती गोरेगाव, ओशिवरा, मालवणी पोलिसांना देण्यात आलाद होता.
या माहितीनंतर सोमवारी ओशिवरा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई समाधान कव्हळे यांनी गस्त घालताना दोन संशयितांना ताब्यात घेतले होते. ते दोघेही एका बाईकवरुन विरुद्ध दिशेने जात होते. या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर ते दोघेही बाईक चोरीच्या गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्यांनी रितेश शाह यांच्या मालकीची बाईक चोरी केल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना बांगुरनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
तपासात दोन्ही अल्पवयीन मुले दिवसा रेकी करुन पार्क केलेल्या बाईकची चोरी करत असल्याचे उघडकीस आले. त्यांनी आतापर्यंत सहा बाईकची चोरी केल्याची कबुली दिली. चोरीच्या या सहाही बाईक पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. त्यांच्या अटकेने बांगुरनगर, एमएचबी, बोरिवली, नेहरुनगर आणि जुहू पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सहा बाईक चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. मौजमजा करण्यासाठी ते दोघेही बाईक चोरी करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. दोन्ही मुले सोळा ते सतरा वयोगटातील असल्याने त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.