बाईक चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील त्रिकुटास अटक

चोरीच्या बाईकचा लिलावात विक्री करत असल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – बाईक चोरीच्या विविध गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या एका रेकॉर्डवरील टोळीचा बोरिवली पोलिसांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत एका त्रिकुटाला पोलिसांनी अटक करुन बाईक चोरीच्या दहा गुन्ह्यांची उकल केली आहे. मिलिंद मनोहर सावंत, यश दिपक कोठारी आणि अरविंद राजन गडकरी अशी या तिघांची नावे असून ते तिघेही बोरिवली आणि कांदिवलीतील रहिवाशी आहेत. त्यांच्या अटकेने बाईक चोरीसह इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. विशेष म्हणजे ही टोळी ऑनलाईन नोंदणी करुन चोरीच्या बाईकच्या लिलावात विक्री करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांनी दुजोरा दिला आहे.

१७ फेब्रुवारीला रात्री उशिरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या आदेशानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक इंद्रजीत पाटील, पोलीस अंमलदार बहिरम, शेख, फर्डे आदी पथक परिसरात गस्त घालत होते. रात्री एक वाजता बोरिवलीतील कुलकर्णी रोड, सुयोग इमारतीजवळ तीनजण संशयास्पद फिरत होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच या पथकाने तीनपैकी मिलिंद सावंत आणि अरविंद गडकरी या दोघांना इमारतीमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असताना शिताफीने ताब्यात घेतले तर त्यांचा तिसरा सहकारी यश कोठारी हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला होता. पळून गेलेल्या यशला काही तासांत या पथकाने अटक केली.

चौकशीदरम्यान ते तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. मिलिंदविरुद्ध मुंबईसह ठाण्यातीतील विविध पोलीस ठाण्यात एकोणीस, यशविरुद्ध मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात चौदा तर अरविंदविरुद्ध तीन गुन्ह्यांची नोंद आहे. ते तिघेही बाईक चोर असून कोणतीही बाईक सहज लॉक तोडून पळवून नेत होते. त्यांनी मुंबईतील विविध परिसरातून रात्रीच्या वेळेस बाईक चोरीची कबुली दिली. त्यांच्या अटकेने बाईक चोरीच्या दहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून चोरीच्या या सर्व बाईक मुंबईसह पुण्यातून जप्त करण्यात आल्या आहेत. या टोळीने अंधेरी, कुरार, दिडोंशी, मुलुंड, बोरिवली परिसरातून बाईक चोरी केल्या होत्या.

चोरीच्या बाईकची अरविंद सावंत लिलावात विक्री करायचा. त्यासाठी त्याने स्वतच्या नावाची ऑनलाईन नोंदणी केली होती. विविध ऑनलाईन बोलीमध्ये तो स्वत सहभागी व्हायचा. लिलावात ठेवलेल्या चोरीच्या बाईकच्या बोगस कागदपत्रासह नंबर प्लेट बनवून विक्री केली जात होती. स्वस्तात बाईक मिळत असल्याने अनेक इच्छुक बाईक खरेदी करत होते. मुंबईतून चोरी केलेल्या बाईक ते पुण्यात ठेवत होते. पुण्यातून चार बाईक जप्त करण्यात या पथकाला यश आले आहे.

ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त धरणेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजीत पाटील, अंमलदार विजय जाधव, किरण बहिरम, रब्बील शेख, प्रविण फर्डे, मिथून भोये यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page