मोबाईल-बाईक चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील आरोपीस अटक
मुंबईसह ठाण्यातील सहा गुन्ह्यांची उकल करण्यात यश
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 मार्च 2025
मुंबई, – मोबाईल व बाईक चोरीच्या गुन्ह्यांतील एका रेकॉर्डवरील आरोपीस मालाड पोलिसांनी अटक केली. शशांक दिपक शेलार असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी चोरीची एक बाईक हस्तगत केली आहे. त्याच्या अटकेने मुंबई आणि ठाण्यातील सहा पोलीस ठाण्यातील सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याचा ताबा लवकरच मुलुंड पोलिसांकडून घेण्यात येणार आहे.
25 वर्षांची तक्रारदार तरुणी ही मालाड परिसरात राहते. 25 जानेवारीला सकाळी साडेसहा वाजता ती मालाड येथील ऑर्लेम चर्च, मेंडीस केक शॉपमध्ये चिकन पॅटीस खरेदी करण्यासाठी आली होती. बारा चिकन पॅटीस घेतल्यानंतर तिने तिच्या मोबाईलवरुन ऑनलाईन पेमेंट करण्याचा प्रयत्न केला. मात्र मोबाईल नेटवर्कमुळे तिला पेमेंट करता आले नाही. त्यामुळे ती केक शॉपच्या बाहेर आली होती. बाहेर आल्यानंतर ती पेमेंट करत असताना तिथे एक तरुण आला आणि त्याने तिच्या हातातील मोबाईल घेऊन पलायन केले होते. या घटनेनंतर तिने मालाड पोलिसांत मोबाईल चोरीची तक्रार केली होती.
याप्रकरणी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल होताच अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त हेमंत सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पन्हाळे, पोलीस निरीक्षक संजय बेडवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार सुखदेवे, पोलीस हवालदार संतोष सातवसे, जयदीप जुवाटकर, अमीत गावड, अविनाश जाधव, पोलीस शिपाई महेश डोईफोडे आणि वैभव थोरात यांनी तपास सुरु केला होता. परिसरातील दोनशेहून अधिक सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. याच फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन या पथकाने शशांक शेलार याला मरिनलाईन्स येथून ताब्यात घेतले होते.
चौकशीत शशांक हा मरिनलाईन्स येथील पोलीस जिमखाना फुटपाथवर राहतो. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध जोगेश्वरी, विलेपार्ले, चर्चगेट रेल्वे, एन. एम जोशी मार्ग, वरळी, राबोडी आणि माहीम पोलीस ठाण्यात सातहून अधिक चोरीसह जबरी चोरी, अपहार आदी गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्या अटकेने मालाड, मुलुंड, निर्मलनगर विष्णूनगर, नौपाडा पोलीस ठाण्यात मोबाईल आणि बाईक चोरीच्या सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
या गुन्ह्यांतील एक बाईक पोलिसांनी हस्तगत केली असून उर्वरित मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार आहे. मोबाईल चोरीनंतर शशांक हा एका बाईकवरुन पळून गेला होता. या बाईकचा क्रमांक प्राप्त केल्यानंतर ती बाईक त्याने मुलुंडच्या हद्दीतून चोरी केली होती. याबाबत बाईक चोरीची मुलुंड पोलिसांत गुन्हा दाखल आहे. ही बाईक पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्याचा ताबा लवकरच मुलुंड पोलिसांकडे सोपविण्यात येणार आहे.