बीट कॉईन गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने गंडा

९८ गुंतवणुकदारांची १.८५ कोटीच्या फसवणुकप्रकरणी गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ डिसेंबर २०२४
मुंबई, – बीट कॉईन गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे सांगून अनेक गुंतवणुकदारांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार दहिसर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एसजेएबी डिजीटल सोल्यूशन या खाजगी कंपनीच्या दोन मालकांसह चौघांविरुद्ध दहिसर पोलिसांनी भादवीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अमीत दर्शनाथ भोसले, अमोल युवराज डोके, लक्ष्मण विसराम चौहाण आणि सुजीत जाधव अशी या चौघांची नावे आहेत. या टोळीने आतापर्यंत ९८ गुंतवणुकदारांची १ कोटी ८५ लाखांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले असले तरी फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चारही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

भिमसिंग खंटे भुल हे भाईंदरचे रहिवाशी असून ते अदानी कंपनीत पूर्वी कामाला होते. चार वर्षांपूर्वी त्यांना एका गुंतवणुक योजनेबाबत माहिती मिळाली होती. या माहितीदरम्यान त्यांची लक्ष्मण चौहाणशी ओळख झाली होती. लक्ष्मणचे दहिसर येथील विठ्ठल मंदिरासमोरच एक कार्यालय होते. तिथे गेल्याने त्याने त्यांना एसजेएबी डिजीटल सोल्यूशन या खाजगी कंपनीची माहिती दिली होती. या कंपनीतील बीट कॉईनवर गुंतवणुक केल्यास भरघोस परतावा मिळत असल्याने त्यांना आमिष दाखविले होते. इतकेच नव्हे तर त्यांना इतरांना कंपनीत गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यास सांगितले. त्यासाठी त्यांना ठराविक कमिशनचे देण्याचे आश्‍वासन दिले होते. काही दिवसांनी लक्ष्मणने त्यांना कंपनीची एक लिंक पाठवून ते ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले होते. त्यामुळे त्यांनी ती लिंक ओपन करुन कंपनीचे ऍप डाऊनलोड केले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलाच्या नावाने बीट कॉईनमध्ये काही रक्कम गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा मिळत होता, त्यामुळे त्यांना त्यांच्यावर विश्‍वास बसला होता. त्यांनी कंपनीच्या स्किमबाबत त्यांच्या परिचित नातेवाईक, मित्रांना सांगितली होती. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून कंपनीत गुंतवणुक केली होती.

या सर्वांना फेब्रुवारी २०२२ पर्यंत परवाता मिळाला होता. मार्च २०२२ रोजी लक्ष्मणने बीट कॉईनच्या दरात वाढ होणार आहे. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त बीट कॉईनमध्ये आताच गुंतवणुक करा असा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर त्यांना चांगले व्याजदर मिळेल असे सांगून त्याने त्यांचा विश्‍वास संपादन केला होता. त्यामुळे लक्ष्मणच्या सांगण्यावरुन तक्रारदारासह इतरांनी कंपनीत मोठ्या प्रमाणात बीट कॉईनमध्ये गुंतवणुक केली होती. मात्र काही महिन्यानंतर त्यांना गुंतवणुक रक्कमेवर मोबदला मिळणे बंद झाला होता. कंपनीचे ऍप अचानक बंद झाले होते. हा प्रकार लक्षात येताच अनेक गुंतवणुकदारांनी दहिसर येथील कार्यालयात धाव घेतली होती. यावेळी त्यांना दहिसर येथील कार्यालयही बंद असल्याचे दिसून आले. लक्ष्मण चौहाण आणि सुजीत जाधव याच्याकडून गुंतवणुकदारांची फसवणुक केल्याचे लक्षात येताच त्यांनी त्यांना संपर्क साधून त्यांच्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र या दोघांनी त्यांना व्याजासहीत पैसे देण्याचे मान्य केले. मात्र कोणालाही पैसे दिले नाही.

तपासादरम्यान कंपनीचे मालक ओमल युवराज डोके आणि अमीत दर्शनाथ भोसले असल्याचे त्यांना समजले होते. त्यामुळे त्यांनी वाशी येथील कार्यालयात त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची भेट झाली नाही. ओमल डोके, अमीत भोसले, लक्ष्मण चौहाण आणि सुजीत जाधव यांनी कंपनीच्या बीट कॉईनमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणुक केली होती. प्राथमिक तपासात आतापर्यंत ९८ गुंतवणुकदारांनी १ कोटी ८५ लाख ४२ हजारांची गुंतवणुक केली होती. त्यापैकी कोणालाही व्याजासहीत मूळ रक्कम देण्यात आली नव्हती.

फसवणुकीचा हा प्रकार तक्रारदारासह अन्य गुंतवणुकदारांनी दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. घडलेला प्रकार सांगून कंपनीच्या दोन्ही मालकासह चौघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अमीत भोसले, ओमल डोके, लक्ष्मण चौहाण आणि सुजीत जाधव यांच्याविरुद्ध भादवीसह महाराष्ट्र ठेवीदाराच्या अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच चारही आरोपी पळून गेले आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. प्राथमिक तपासात ही फसवणुक १ कोटी ८५ लाखांची असली तरी फसवणुकीचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page