क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीच्या नावाने बीटकॉईनचा अपहार
फसवणुकीच्या गुन्ह्यांतील आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
1 मार्च 2025
मुंबई, – क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीच्या नावाने एका लॉचे शिक्षण घेणार्या 38 वर्षांच्या व्यक्तीच्या वॉलेटमधील सुमारे साडेनऊ लाखांच्या बीटकॉईनचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रित तुषार त्रिवेदी या महिलेविरुद्ध बीकेसी पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रितविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांत बोगस दस्तावेज सादर करुन पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी अन्य एका गुन्ह्यांची नोंद असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
यातील तक्रारदार अंधेरी येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत विलेपार्ले येथील जितेंद्र चौहाण कॉलेज ऑफ लॉ या कॉलेजमध्ये एलएलबीच्या तिसर्या वर्षाचे शिक्षण घेतात. 2017 साली त्यांनी एका खाजगी कंपनीत क्रिप्टो करन्सीसाठी एक वॉलेट बनविले होते. या वॉलेटमधून त्यांनी काही बिटकॉईन खरेदी केले होते. 19 ऑक्टोंबर 2024 रोजी ते त्यांच्या वडिलांसोबत फोर्ट येथील एका हॉटेलमध्ये होते. तिथेच त्यांची प्रित त्रिवेदीशी ओळख झाली होती. या ओळखीदरम्यान तिने ती मुंबईत नवीन असून जवळपास फॉरेन एक्सचेंज आहे याबाबत विचारणा केली होती. याच संभाषणादरम्यान ती एका खाजगी कंपनीची मालक असून या कंनीचे दुबई, लंडन आणि पुणे शहरात कार्यालय असल्याचे सांगितले.
ही कंपनीत क्रिप्टो करन्सीचे काम करते. तिने त्यांना तिच्या कंपनीच्या माध्यमातून क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन त्यांना गुंतवणुकीवर चांगला फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर ती त्यांना सतत फोन करुन याबाबत विचारणा करत होती. यावेळी तिने क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुक केल्यास त्यांना आठ टक्के परतावा देण्याचे आश्वासन देऊन त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. याच दरम्यान त्यांची जुहू येथे एका कॉफी शॉपमध्ये भेट झाली होती. या भेटीत तिने तिच्या पतीसोबत तिचे पटत नसून त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यामुळे तिने स्वतचा व्यवसाय सुरु असून त्यात तिने अनेकांना चांगला फायदा मिळवून दिल्याचे सांगितले.
तिच्यावर विश्वास ठेवून त्यांनी तिने सांगितलेले एक अॅप डाऊनलोड केले होते. या अॅपच्या माध्यमातून तिने त्यांच्या वॉलेटमधील बीटकॉईन ट्रान्स्फर केले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तिला विचारणा केली. यावेळी तिने दोन दिवसांत ते बीटकॉईन त्यांच्या वॉलेटमध्ये जमा होइ्रल असे सांगतले. मात्र एक आठवडा उलटूनही तिने साडेनऊ लाखांचे बीटकॉईन वॉलेटमध्ये परत केले नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तिच्याविषयी सोशल मिडीयावर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता.
त्यात त्यांना प्रितविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बोगस दस्तावेज सादर करुन अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे समजले होते. त्यामुळे त्यांनी तिच्याविरुद्ध बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर प्रित त्रिवेदीविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.