बीटकॉईन गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची फसवणुक
27 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
20 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – बीटकॉईन गुंतवणुकीच्या आमिषाने एका व्यावसायिकाची चारजणांच्या टोळीने सुमारे 27 लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह चारही आरोपीविरुद्ध मध्य प्रादेशिक सायबर सेल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकीसाठी या टोळीतील एका तरुणीने तक्रारदार व्यावसायिकाची मैत्री केली होती, या मैत्रीनंतर त्यांना बीटकॉईनमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन ही फसवणुक करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
राहुल चंद्रविजय जैन यांचा इमारत साहित्य होलसेलमध्ये ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. सध्या ते त्यांच्या कुटुंबियासोबत घाटकोपर परिससरात राहतात. त्यांचे टेलीग्रामवर एक अकाऊंट असून अकाऊंटची ते अधूनमधून पाहणी करतात. जुलै महिन्यांत त्यांना ऐश्वर्या नावाच्या एका तरुणीने मॅसेज पाठविला होता. त्यात तिने त्यांना व्हॉटअप क्रमांक देण्यास सांगितले होते. त्यांचा मोबाईल क्रमांक शेअर केल्यानंतर त्यांच्यात संभाषण सुरु झाले. काही दिवसांत ते दोघेही चांगले मित्र झाले होते. तिने त्यांना बीटकॉईनविषयी माहिती सांगून त्यात गुंतवणुक केल्यास त्यांना आगामी दिवसांत चांगला फायदा होईल असे सांगितले होते. तिच्यावर विश्वास ठेवून त्यांनी तिला गुंतवणुक करण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर तिने त्यांना एक लिंक पाठविली होती. त्यात एक होमपेज ओपन करुन त्यांना त्यांची वैयक्तिक माहितीसह बँक खात्याची माहिती अपलोड करण्यास सांगण्यात आले होते.
ऐश्वर्याच्या सांगण्यावरुन त्यांनी त्यांची माहिती अपलोड केली होती. यावेळी त्यांचे एक अकाऊंट ओपन झाले होते. यावेळी त्यांना बीटकॉईनबाबत माहिती दिली जात होती. पेजवरील कस्टमर केअरचे प्रतिनिधी त्यांना बीटकॉईनची माहिती देऊन गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करत होते. त्यांच्या आमिषाला बळी पडून त्यांनी त्यांच्या बँक खात्यासह त्यांच्या कर्मचार्यांच्या दोन बँक खात्यातून जुलै ते ऑक्टोंबर 2025 या कालावधीत 27 लाख 50 हजार रुपयांचे बीटकॉईनवर गुंतवणुक केली होती. ऐश्वर्याच्या सांगण्यावरुन त्यांना या गुंतवणुकीवर चांगला फायदा होत असल्याचे दिसून आले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या अकाऊंटमधून काही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, त्यात त्यांना वीस हजार रुपये प्राप्त झाले होते.
मात्र त्यांना उर्वरित रक्कम काढता येत नव्हती. बरेच प्रयत्न करुनही त्यांना त्यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करता आले नाही. त्यामुळे त्यांनी ऐश्वर्यासह कस्टम केअर प्रतिनिधींकडे विचारणा केली होती. यावेळी त्यांना त्यांनी त्यांचे ट्रेडिंग अकाऊंट फ्रिज झाले आहे. ते सुरु करण्यासाठी त्यांना आणखीन काही रक्कमेचे बीटकॉईन खरेदी करावे लागतील असे सांगण्यात आले. हा संपूर्ण प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी आणखीन रक्कम गुंतवणुक करण्यास नकार दिला. तयानंतर त्यांनी त्यांना प्रतिसाद देणे बंद केले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर हेल्पलाईनसह मध्य प्रादेशिक सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर ऐश्वर्यासह इतर तिघांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा सायबर सेलचे अधिकारी तपास करत आहेत.