मिक्सरच्या धडकेने दहा वर्षांच्या शाळकरी मुलीचा मृत्यू
ऍक्टिव्हा बाईकस्वारासह मिक्सर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – भरवेगात ऍक्टिव्हा बाईक चालविण्याच्या प्रयत्नात ऍक्टिव्हाला मिक्सरची धडक लागून झालेल्या अपघातात शिफा सोहेल शेख या दहा वर्षांच्या शाळकरी मुलीचा मृत्यू झाला तर तिचा लहान भाऊ उमर सोहेल शेख आणि ऍक्टिव्हा बाईकस्वार जाफर सिंकदर पठाण हे दोघेही किरकोळ जखमी झाले होते. या अपघाताला ऍक्टिव्हा बाईकस्वारासह मिक्सरचालक जबाबदार असल्याने या दोघांविरुद्ध बीकेसी पोलिसांनी हलगर्जीपणाने वाहन चालवून एका शाळकरी मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. अल्ताफ फारुख अहमद आणि जाफर सिंकदर पठाण अशी या दोघांची नावे असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांनी सांगितले.
हा अपघात बुधवारी सायंकाळी पावणेसात वाजता वांद्रे येथील बीकेसी रोड, कुर्ला वाहिनीवरील प्लॅटिना जंक्शनजवळ झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सोहेल सिराजउद्दीन शेख हे कापड व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत वांद्रे येथे राहतात. त्यांना शिफा (१०) आणि उमर (७) नावाचे दोन मुले असून शिफा ही ड्युरेली कॉन्हेंट स्कूलमध्ये चौथीत तर उमर हा सेंट ट्रिझा हायस्कूलमध्ये दुसरीत शिकतो. या दोघांनाही शाळेतून घरी आणि घरातून शाळेत नेण्यासाठी त्यांनी रिक्षाचालक जाफर पठाण याच्यावर जबाबदारी सोपविली होती. काही कामानिमित्त जाफर हा पाच दिवस नसल्याने त्याने त्यांना मुलांना शाळेतून आणण्यास सांगितले होते. त्यामुळे ते स्वतला दोन्ही मुलांना बाईकवरुन शाळेत सोडण्यासाठी तसेच शाळा सुटल्यानंतर त्यांना घरी आणण्यासाठी जात होते.
बुधवारी त्यांना जाफरने फोन करुन तो मुलांना शाळेतून घरी त्याच्या ऍक्टिव्हा बाईकवरुन आणतो असे सांगितले होते. सायंकाळी दोन्ही मुलांना शाळेतून घेतल्यानंतर तो घरी जाण्यासाठी निघाला होता. ही बाईक सायंकाळी पावणेसात वाजता कुर्ला वाहिनीवरुन जाताना एका मिक्सरने त्यांच्या बाईकला धडक दिली होती. त्यामुळे बाईक स्लीप होऊन ते तिघेही खाली पडले होते. यावेळी शिफाच्या डोक्यावरुन मिक्सरचे चाक गेले होते. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच बीकेसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या शिफाला तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे शिफाला डॉक्टरांनी मृत घोषित् केले. या अपघाताची माहिती मिळताच सोहेल शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
यावेळी त्यांचा मुलगा उमरने जाफर हा भरवेगात बाईक चालवत होता. यावेळी शिफाने त्याला बाईक सावकाश चालविण्यास सांगितले, तरीही त्याने त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्याने मुलांना रिक्षातून का आणले नाही याबाबत त्यांनी जाफरला जाब विचारला असता त्याने त्याच्या रिक्षाची कागदपत्रे व्यवस्थित नव्हती. त्याच्या रिक्षावर पोलिसाकडून अनेकदा दंडात्मक कारवाई झाली होती. शाळेतून मुलांना आणण्यासाठी तो ऍक्टिव्हा बाईकने जात आहे याची कुठलीही पूर्वकल्पना त्याने दिली नव्हती. त्यामुळे या अपघाताला मिक्सर चालक अल्ताफ अहमद याच्यासह जाफर पठाण हादेखील जबाबदार असल्याचा आरोप करुन सोहेल शेख यांनी या दोघांविरुद्ध बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.