सोन्याचे बोगस बिस्कीट देऊन तीस लाखांच्या दागिन्यांचा अपहार
पाच महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – सोन्याचे बोगस बिस्कीट देऊन एका ज्वेलर्स व्यापार्याची सुमारे तीस लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी सौमित्र मृत्यूंजय पान या आरोपीस बीकेसी पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सौमित्राची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या गुन्ह्यांत इतर दोघांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे.
हितेश मनोजकुमार वलेचा हे कल्याणच्या खडकपाड्यातील रहिवाी आहे. त्यांचा भिवंडी येथील भूमी वर्ल्ड इंडस्ट्रियल पार्कमध्ये दागिने बनविण्याचा, तयार झालेले सोन्याचे दागिने होलसेलमध्ये विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या कारखान्यात तीस कामगार असून ते व्यापार्यांकडून शुद्ध सोने घेऊन त्यामोबदल्यात त्यांना सोन्याचे दागिने बनवून देतात. 16 एप्रिल 2025 रोजी त्यांना नवीन जैन नावाच्या एका व्यक्तीने कॉल केला होता, त्याने त्यांच्याकडे सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली होती. त्यासाठी त्याने त्यांना दागिन्यांचे डिझाईन पाठविले हाते. 800 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्याच्या बदल्यात त्याने त्यांना सोन्याचे बिस्कीट देण्याचे आश्वासन दिले होते.
22 एप्रिलला नवीन जैनने त्यांना कॉल करुन दागिने तयार झाले का याबाबत विचारणा करुन त्यांना दागिन्यांची डिलीव्हरी वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्समधील रिद्धी डायमंड कंपनीच्या कार्यालयात आणून देण्यास सांगितले. ते कार्यालय त्यांच्या काकाचे असून तिथेच सर्व व्यवहार होईल असे सांगितले. त्यामुळे हितेश वलेचा यांचा कर्मचारी अमन सोनी हा दागिन्यांची डिलीव्हरीसाठी तिथे गेला होता. 30 लाखांचे 315 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दिल्यानंतर मिहीर शाहने त्याला शंभर ग्रॅम वजनाचे तीन सोन्याचे बिस्कीट दिले होते. डिलीव्हरीनंतर अमन हा हितेश वलेचा यांच्या घरी आला होता. यावेळी त्याने त्याच्याकडील सोन्याचे बिस्कीट त्यांना दिले.
या बिस्कीटची पाहणी केली असता ते बिस्कीट बोगस असल्याचे हितेश वलेचा यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी मिहीर शाह आणि नवीन जैन यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी या दोघांचे मोबाईल बंद येत होते. या दोघांनी सोन्याच्या दागिन्यांच्या बदल्यात सोन्याचे बिस्कीट देतो असे सांगून त्यांना बोगस बिस्कीट देऊन त्यांची सुमारे तीस लाखांची फसवणुक केली होती.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बीकेसी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून मिहीर शाह आणि नवीन जैन नाव सांगणार्या दोन्ही भामट्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुुर केला होता. आरोपींच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरु असताना गेल्या पाच महिन्यांपासून फरार असलेल्या सौमित्र पान याला पोलिसांनी याला तांत्रिक माहितीवरुन पोलिसंनी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्याच्यासह त्याच्या दोन मित्रांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यामुळे या दोघांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. अटकेनंतर सौमित्राला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.