मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
1 डिसेंबर 2025
मुंबई, – हिर्यांचा अपहार करुन एका हिरे व्यापार्याची फसवणुक केल्याप्रकरणी राजेशकुमार रामगोपाळ शर्मा नावाच्या सुरतच्या हिरे व्यापार्याला बीकेसी पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर तक्रारदार व्यापार्याकडून क्रेडिटवर घेतलेल्या 1 कोटी 81 लाख रुपयांचा हिर्यांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही व्यापार्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
राजेश बेचरभाई विठाणी हे 48 वर्षांचे हिरे व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत नाना चौक परिसरात राहतात. त्यांची भागीदारीत संजय ब्रदर नावाची एक कंपनी असून कंपनीचे मुख्य कार्यालय वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्समध्ये आहे. याच कार्यालयातून त्यांचा हिरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय चालतो. मार्केटमधील हिरे व्यापारी, डिलर आणि ब्रोकर यांच्या मदतीने हा व्यवसाय चालत असल्याने त्यांची अनेकांशी चांगली ओळख आहे. या व्यवसायादरम्यान त्यांची ज्वेलर्स कृष्णा कंपनीचे मालक राजेशकुमार शर्माशी ओळख झाली होती. गेल्या तीन वर्षांपासून ते दोघेही एकमेकांच्या परिचित होते.
राजेशकुमार स्वत ज्वेलर्स आणि हिरे व्यापारी असून त्यांचा गुजरातच्या सुरत शहरात व्यवसाय चालत होता. त्यांनी त्यांना क्रेडिटवर हिरे विक्रीसाठी दिले होते, या हिर्यांचे पेमेंट त्यांनी वेळेवर केले होते. त्यामुळे त्यांना त्याच्यावर विश्वास होता. 10 मार्चला राजेशकुमारच्या एका कर्मचार्याने त्यांच्या कर्मचारी मित किशोरभाई विठाणी यांना कॉल केला होता. त्याने तो राजेशकुमार यांच्या कार्यालयात बोलत असल्याचे सांगून त्यांच्याकडे हिर्यांसाठी चांगले ग्राहक आहेत. त्यामुळे त्यांना हिर्यांची गरज असल्याचे सांगितले होते. राजेशकुमारच्या सांगण्यावरुन त्यांनी त्यांना 444 कॅरेटचे 1 कोटी 31 लाख 23 हजार 370 रुपयांचे आणि नंतर 475 कॅरेटचे 49 लाख 96 हजार 110 रुपयांचे हिरे असे एकूण 1 कोटी 81 लाख 19 हजार 480 रुपयांचे हिरे क्रेडिटवर दिले होते.
या व्यवहाराच्या झांगड पावती राजेश विठाणी आणि राजेशकुमार यांची सही होती. पंधरा दिवसांत त्यांचा व्यवहार पूर्ण होणार होता, त्यामुळे त्यांनी पंधरा दिवसांत पेमेंट किंवा हिरे परत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत राजेशकुमारने हिर्यांचे पेमेंट केले नाही किंवा हिरे परत आणून दिले नव्हते. त्यामुळे त्यांनी राजेशकुमारला कॉल केला होता. यावेळी त्याने त्याचा अपघात झाला असून ऑपरेशन झाल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याला एक महिन्यानंतर कॉल केला होता. यावेळी त्याने त्याच्या मुलीचे हार्टचे ऑपरेशन झाल्याचे सांगून त्यांचा व्यवहार लवकरच पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिले होते.
पाच महिने उलटूनही राजेशकुमारने त्याचा शब्द पाळला नाही. कॉल केल्यानंतर तो विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. राजेशकुमारकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याच्याविरुद्ध बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर राजेशकुमार शर्माविरुद्ध पोलिसांनी हिर्यांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
याच गुन्ह्यांत गेल्या तीन महिन्यांपासून तो फरार होता. अखेर त्याला गुजरात येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याच्यावर अटकेची कारवाई करुन त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अटकेंनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.