मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – कन्स्ट्रक्शन व्यवसायात गुंतवणुकीसाठी एका व्यक्तीची सुमारे सव्वाकोटी रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी एका बिल्डरविरुद्ध बीकेसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आकाश राजेंद्र कांबळी असे या आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. आकाशने अशाच प्रकारे इतर काही लोकांना गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन त्यांची फसवणुक केल्याचे बोलले जाते, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची पोलिसाकडून चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले.
अक्षय विश्वनाथ हे मालाड परिसरात राहतात. दोन वर्षांपूर्वी त्याची आकाश कांबळी याच्यासोबत ओळख झाली होती. या ओळखीदरम्यान त्यांना आकाशची शिल्पा कन्स्ट्रक्शन नावाची एक कंपनी असून तो या कंपनीचा मालक असल्याचे समजले होते. त्याने त्यांना त्याच्या कन्स्ट्रक्शन व्यवसायात गुंतवणुकीची ऑफर देत त्यांना या गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. ही ऑफर चांगली वाटल्याने त्यांनी त्याच्याकडे एक कोटी पाच लाख रुपये गुंतवणूक केली होती. काही दिवसांनी त्याने त्याच्या कंपनीचे खाते अनफिज करण्यासाठी आणखीन काही पैशांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी त्याला पंधरा लाख ऐंशी हजार रुपये होते.
अशा प्रकारे त्यांनी त्याला गुंतवणुकीसह बँक खाते अनफिज करण्यासाठी फेब्रुवारी २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत एक कोटी वीस लाख ऐंशी हजार रुपये दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना मूळ रक्कमेसह परतावा रक्कम दिली नाही. विचारणा केल्यानंतर तो त्यांना सतत टाळण्याचा प्रयत्न करत होता. नंतर त्याने त्यांचे कॉल घेणे बंद केले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच अक्षय विश्वनाथ यांनी बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आकाश कांबळीविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.