होलसेलमध्ये कपडे विक्रीचा बनाव करुन बारा लाखांची कॅश पळविली
चार तोतया पोलिसांसह सातजणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 मार्च 2026
मुंबई, – होलसेलमध्ये कपडे विक्रीचा बनाव करुन नागपूरमधील एका तरुण कापड व्यापार्याकडील सुमारे बारा लाखांची कॅश सातजणांच्या टोळीने पळवून नेल्याची घटना वांद्रे येथील बीकेसी परिसरात उघडकीस आली आहे. कपड्याचा व्यवहार सुरु असताना पोलिसांचा छापा पडल्याचे सांगून या टोळीने ही कॅश घेऊन पलायन केले होते. याप्रकरणी चार तोतया पोलिसांसह सातजणांविरुद्ध बीकेसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. साहिल, निहाल बन्सल, रोहन अग्रवालसह इतर चौघांचा समावेश आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या सातही आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
निलेश मिलिंद गायकवाड हा तरुण मूळचा नागपूरचा रहिवाशी असून त्याचे वडिल सेवानिवृत्त एक्साईज अधिकारी आहे. त्याला स्वतचा कपड्याचा नवीन व्यवसाय सुरु करायचा होता. त्यासाठी त्याने त्याच्या कुटुंबियांसह मित्रांकडून बारा लाख रुपये घेतले होते. होलसेल कपडे खरेदीसाठी तो ऑक्टोंबर 2025 रोजी दिल्लीला गेला होता. तिथेच त्याची साहिल या आरोपीशी ओळख झाली होती. त्याने त्याचा विश्वास संपादन करुन त्याचा मित्र निहाल बन्सल मुंबईत राहत असून त्याचा स्वतचा कपड्याचा कारखाना आहे. तो त्याला होलसेलमध्ये कपडे देईल असे सांगितले होते. त्यानंतर निलेश हा निहालच्या संपर्कात होता. 15 मार्चला तो मुंबईत कपडे खरेदीसाठी आला होता. यावेळी त्याने निहालला फोन करुन कपडे खरेदीबाबत चर्चा केली होती.
या चर्चेदरम्यान त्याने कपड्याचा खरेदी-विक्रीचा सर्व व्यवहार कॅशमध्ये होईल असे सांगितले होते. ठरल्याप्रमाणे 18 मार्चला सकाळी अकरा वाजता तो बारा लाख रुपये घेऊन सांताक्रुज येथील एका हॉटेलजवळ आला होता. निहानला कॉल केल्यानंतर त्याने रोहन अग्रवाल हा कपडे घेऊन येईल, त्याला कॅश देण्यास सांगितले. त्यामुळे निलेश हा त्याच्या दोन मित्रांसोबत तिथे त्याची वाट पाहत होते. काही वेळानंतर निहालने त्यांना वांद्रे येथील बीकेसी येथे येण्यास सांगितले. त्यांच्याकडील बारा लाख रुपये घेतल्यानंतर त्याने रोहन अग्रवाल हा कपड्याची डिलीव्हरी घेऊन येईल असे सांगितले.
याच दरम्यान तिथे एक इनोव्हा कार आली आणि कारमधून चार तरुण उतरले. यावेळी त्यांनी पोलिसांचा छापा पडला असून पळा असा आरडाओरडा सुरु केला होता. त्यामुळे ते सर्वजण पळून गेले होते. काही वेळानंतर त्याने निहालला कॉल करुन कपड्याबाबत विचारणा केली, मात्र त्याने त्याला काहीच प्रतिसाद दिला नाही. पोलिसांची धाड पकडल्याचा बनाव करुन या सातही आरोपींनी कपडे खरेदीसाठी बीकेसी येथे बोलावून त्यांची फसवणुक केली होती.
हा प्रकार लक्षात येताच निलेश गायकवाड यांनी बीकेसी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून सातही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर साहिल, निहाल बन्सल, रोहन अग्रवाल व चार तोतया पोलीस अशा सातजणांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु असून सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. संबंधित आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांनी अशाच प्रकारे इतर गुन्हे केल्याचे बोलले जाते.