गुंतवणुकीच्या नावाने कर्ज काढून कंपनीची ३.४२ कोटीची फसवणुक
वांद्रे येथील बीकेसीतील घटना; सिनिअर मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ मार्च २०२४
मुंबई, – गुंतवणुकीच्या नावाने बँकेतून कर्ज काढून कंपनीची ३.४२ कोटीची फसवणुक झाल्याचा प्रकार बीकेसी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका खाजगी कंपनीत सिनिअर मॅनेजर म्हणून काम करणार्या चिंतन भरत शेठ याच्याविरुद्ध बीकेसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच चिंतनची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
यातील तक्रारदार मालाड येथे राहत असून बीकेसीतील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. याच कंपनीत चिंतन हा सिनिअर मॅनेजर म्हणून कामाला होता. गुंतवणुकीच्या नावाने त्याने दोन कर्मचार्यांच्या नावाने बँकेतून कर्ज काढले होते. कर्जाची ही रक्कम गुंतवणुक करणार असल्याचे सांगून त्याने कर्जाच्या सुमारे ८५ लाखांचा अपहार केला होता. कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे बँकेने दोन्ही कर्मचार्याकडे विचारणा केल्यानंतर फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे कंपनीने चिंतनला कामावरुन निलंबित केले होते. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची कंपनीने चौकशी सुरु केली होती. त्यासाठी कंपनीने तपास यंत्रणा आणि फॉरेन्सिक टिमची नियुक्ती केली होती. या टिमच्या चौकशीत चिंतनने रुची विभाकर या महिलेकडून ३२ लाख रुपये घेतले होते. मोबदल्यात तिला कंपनीचे बोगस दस्तावेज दिले होते. या दस्तावेजाच्या आधारे या महिलेच्या बँक खात्यातून कर्ज काढण्यात आले होते.
चिंतनने कंपनीच्या लेटरहेड, स्टॅम्पसह संचालकाच्या नावाचा व सहीचा गैरवापर करुन ही फसवणुक केली होती. या टिमने नंतर त्यांचा अहवाल वरिष्ठांना सादर केला होता. त्यात चिंतनने ३ कोटी ४२ लाख रुपयांची फसवणुक केल्याचे नमूद केले होते. या प्रकारानंतर कंपनीच्या वतीने बीकेसी पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.