सीसीटिव्ही फुटेजमुळे तीस लाखांच्या दागिन्यांचा पर्दाफाश
ज्वेलर्स कंपनीतील महिला कर्मचार्याविरुद्ध चोरीचा गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 एपिल 2025
मुंबई, – वांद्रे येथील एका खाजगी ज्वेलरी कंपनीतील सीसीटिव्ही फुटेजमुळे सुमारे तीस लाखांच्या सतरा गोल्ड ज्वेलरी चोरीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ही चोरी कंपनीतील श्रुती विजय पाणीग्रही या महिला कर्मचार्याने केल्याचे उघडकीस येताच तिच्याविरुद्ध कंपनीच्या वतीने बीकेसी पोलिसांत चोरीची तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी चोरीचा गुन्हा नोंदवून बीकेसी पोलिसांनी चोरीचा तपास सुरु केला आहे. याच गुन्ह्यांत श्रुती पाणीग्रहीची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
संजय क्रिष्णा कोरगांवकर हे वांद्रे येथील एच. के ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेड-किसना डायमंड अॅण्ड गोल्ड या कंपनीत फायनान्स हेड म्हणून कामाला आहे. या कंपनीचे वांद्रे येथील बीकेसी परिसरात कार्यालय असून त्यांचा होलसेल सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. 31 मार्चला कंपनीच्या ऑडिट विभागामार्फत जानेवारी आणि फेबु्रवारी महिन्यांचे सोन्याच्या दागिन्यांचे ऑडिट करण्यात आले होते. या ऑडिटमध्ये चार सोनसाखळी, तीन मंगळसूत्र, सहा नेकलेस, एक नोजरिंग, तीन रिंग असे सुमारे तीस लाखांचे सतरा गोल्ड ज्वेलरी मिसिंग असल्याचे संबंधित अधिकार्यांच्या निदर्शनास आले होते.
हा प्रकार नंतर कंपनीच्या मालकांना समजताच त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश संजय कोरगांवकर यांना दिले होते. या घटनेनंतर कंपनीतील दोन महिन्यांचे सीसीटिव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली होती. त्यात कंपनीची महिला कर्मचारी श्रुती पाणीग्रही ही हातचलाखीने सोन्याचे दागिने चोरी करत असल्याचे दिसून आले. सीसीटिव्ही फुटेजमध्ये या चोरीचा पर्दाफाश होताच श्रुतीची संबंधित अधिकार्यांनी चौकशी केली होती.
यावेळी तिने उडवाडवीचे उत्तरे देऊन त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर कंपनीच्या वतीने संजय कोरगांवकर यांनी संबंधित सीसीटिव्ही फुटेज सादर करुन बीकेसी पोलिसांत श्रुती पाणीग्रही हिच्याविरुद्ध चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.