3.12 कोटीच्या हिर्‍यांचा अपहार करुन दोन व्यापार्‍यांची फसवणुक

तीन आरोपींविरुद्ध दोन स्वतंत्र अपहारासह फसवणुकीचा गुन्हे दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
13 एपिल 2025
मुंबई, – क्रेडिटवर घेतलेल्या 3 कोटी 12 लाख रुपयांचा हिर्‍यांचा अपहार करुन दोन हिरे व्यापार्‍यांची फसवणुक झाल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन आरोपीविरुद्ध बीकेसी पोलिसांनी दोन स्वतंत्र अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. निशीत हसमुखभाई मेहता, विशाल विनोदलाल शहा आणि शालिभद्रा कोठारी अशी या तिघांची नावे आहेत. ते तिघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी बीकेसी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

पहिल्या गुन्ह्यांतील तक्रारदार रोमेल हिंमतलाल वोरा हे विलेपार्ले परिसरात राहत असून हिरे व्यापारी आहेत. त्यांची रोमेल इंम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्स परिसरात आहे. याच कार्यालयातून ते हिर्‍यांची खरेदी-विक्री करतात. 31 जुलै 2023 रोजी त्यांच्या कार्यालयात शालिभद्रा कोठारी हा आला होता. त्याने त्यांच्याकडून 2 कोटी 3 लाख रुपयांचा 8 कॅरेटचा एक हिरा विक्रीसाठी क्रेडिटवर घेतला होता. काही दिवसांत हिर्‍यांचे पेमेंट किंवा विक्री न झाल्यास हिरा परत आणून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र जुलै 2023 पर्यंत त्याने हिर्‍याचे पेमेंट केले नाही किंवा हिरा परत कार्यालयात जमा केला नव्हता. जवळपास दिड वर्ष उलटूनही भालिभद्रा कोठारीने त्याचे आश्वासन पाळले नाही. याच दरम्यान तो पळून गेल्याची खात्री होताच रोमेन वोरा यांनी बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती.

ही घटना ताजी असताना समीर जगदीश शाह या हिरे व्यापार्‍याने त्यांच्या परिचित दलालासह व्यापारी निशीत मेहता आणि विशाल शहा यांच्याविरुद्ध बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती. समीर शहा हे हिरे व्यापारी असून त्यांची अरन्य डायमंड इंटरनॅशनल नावाची एक कंपनी असून या कंपनीचे एक कार्यालय भारत डायमंड बोर्समध्ये आहे. निशीत आणि विशाल हे दोघेही त्यांच्या परिचित असून गेल्या वर्षी एप्रिल महिन्यांत ते त्यांच्या कार्यालयात आले होते. तयांच्याकडे हिरे खरेदी करणारे चांगले ग्राहक आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे क्रेडिटवर हिर्‍यांची मागणी केली होती. त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांनी त्यांच्याकडून 175 कॅरेटचे एक कोटी नऊ लाखांचे हिरे क्रेडिटवर घेतले होते. काही दिवसांत हिर्‍यांचे पेमेंट किंवा हिरे परत करण्याचे आश्वासन देऊन ते दोघेही निघून गेले होते.

मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी पेमेंट केले नाही किंवा हिरे परत केले नव्हते. या दोघांना संपर्क साधल्यानंतर त्यांचे मोबाईल बंद होते. ते दोघेही हिरे घेऊन पळून गेल्याचे समजताच त्यांनी बीकेसी पोलिसांत दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या दोन्ही तक्रारीनंतर संबंधित तिन्ही आरोपीविरुद्ध बीकेसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या तिघांनी अशाच प्रकारे इतर व्यापार्‍यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page