मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 एप्रिल 2025
मुंबई, – क्षुल्लक कारणावरुन आईला मारहाण करताना मध्यस्थी करताना 31 वर्षांच्या मुलाने 65 वर्षांच्या वयोवृद्ध पित्याची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी वांद्रे परिसरात घडली. राजूपेंडा मुर्गोंडा असे हत्या झालेल्या पित्याचे नाव असून त्यांच्या हत्येप्रकरणी आरोपी मुलगा नरसिंह पेंडाराज मुर्गोंडा याला बीकेसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध हत्येच्या कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने शुक्रवार 11 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांनी सांगितले.
ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता वांद्रे येथील बीकेसी, वाल्मिकी नगरात घडली. याच परिसरात राजूपेंडा हा त्याची पत्नी आणि आरोपी मुलासोबत राहत होता. नरसिंह हा हाऊसकिपिंगचे काम करत होता. त्याच्या नोकरीमुळे त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. राजूपेंडा हा काहीच कामधंदा करत नव्हता. त्याला दारु पिण्याचे व्यसन होते. अनेकदा दारु पिऊन तो क्षुल्लक कारणावरुन त्याच्या पत्नीला शिवीगाळ करुन मारहाण करत होता. हा प्रकार नियमित घडत असल्याने त्याकडे नरसिंह हा नेहमीच दुर्लक्ष करत होता. शनिवारी सायंकाळी राजूपेंडा हा मद्यप्राशन करुन घरी आला.
काही वेळानंतर त्याने क्षुल्लक कारणावरुन त्याच्या पत्नीला शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केला. त्याचा राग आल्याने त्याने त्यांच्यात भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्याने त्याला शिवीगाळ केली होती. रागाच्या भरात त्याने घरातील चाकूने राजपेंडा यांच्या छातीत भोसकले होते. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे रक्तबंबाळ झालेल्या राजूपेंडाला तातडीने जवळच्या भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण व त्यांच्या पथकाने धाव घेतली होती.
घडलेला प्रकार उघडकीस आल्यानंतर नरसिंह याच्याविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर रविवारी दुपारी त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्यांतील चाकू पोलिसांनी जप्त केला असून आईला मारहाण करणे सहन न झाल्याने नरसिंहने त्याच्या पित्याला चाकूने भोसकले होते असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांनी सांगितले.