कार्यालयासाठी घेतलेल्या ३० लाखांचा अपहार करुन फसवणुक
काळबादेवीतील व्यावसायिकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ जुलै २०२४
मुंबई, – वांद्रे येथील बीकेसी परिसरातील कंपनीच्या कार्यालयासाठी सुमारे तीस लाखांचा व्यवहार करुन एका व्यावसायिकाची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी काळबादेवीतील व्यावसायिक धिरेन गोकलदास संपत याच्याविरुद्ध बीकेसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मूळचे कोल्हापूरचे रहिवाशी असलेले अभिजीत ऊर्फ किरण अरविंद पाटील हे व्यावसायिक असून ठाण्यातील कोलशेत रोडवर राहतात. त्यांचा पार्टनरशीपमध्ये शेतजमीन आणि फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचा व्यवसाय मुंबईसह नवी मुंबई आणि ठाण्यात चालतो. त्यासाठी त्यांना मुंबईत एक कार्यालय विकत घ्यायचे होते. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. त्यांनी त्यांच्या परिचित काही रियल इस्टेट एजंट मित्रांशी कार्यालयासाठी जागेसंदर्भात बोलणी केली होती. एप्रिल २०२३ रोजी त्यांचा एक मित्र समीत रामचंद्र राणे यांनी त्यांना फोनवरुन वांद्रे येथील बीकेसी परिसरात मेसर्च सानूची ऍडवायझर्स कंपनीच्या कार्यालयाची जागा विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले होते. दोन्ही कार्यालयाचे क्षेत्रफळ ४२७ चौ. फुटाचे असून ते कार्यालय काळबादेवी येथील रहिवाशी असलेल्या धिरेन संपत यांच्या मालकीची होते. त्यामुळे त्यांनी धिरेशशी संपर्क साधून त्यांच्या कंपनीच्या कार्यालयाच्या जागेविषयी विचारणा केली होती. त्यानंतर ते त्यांच्या मित्रांसोबत जागेची पाहणीसाठी गेले होते. ती जागा त्यांच्या व्यवसायासाठी योग्य होती. त्यामुळे त्यांनी ते दोन्ही कार्यालय खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी धिरेन संपतने त्यांना जागेसाठी बँकेतून कर्ज घेतल्याचे समजले. कर्ज फेडल्यानंतर त्यांना जागेचे कागदपत्रे देण्याचे आश्वासन दिले होते.
चर्चेअंती त्यांच्यात ५० लाखांमध्ये खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला होता. त्यापैकी कर्जाची रक्कम फेडल्यानंतर ते कागदपत्रे त्यांच्या स्वाधीन करणार होते. त्यामुळे त्यांनी त्याला तीस लाख रुपयांचे पेमेंट केले होते. त्यानंतर त्यांच्यात कायदेशीर करार झाला होता. कागदपत्रे दिल्यानंतर उर्वरित पेमेंट देण्याचे ठरले होते. मात्र दोन ते तीन महिने उलटूनही त्यांनी कार्यालयाचे कागदपत्रे दिली नाही. याबाबत विचारणा करुनही त्याच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. हा प्रकार संशयास्पद वाटताच अभितीत पाटील यांनी त्यांच्यातील व्यवहार रद्द करुन धिरेन संपतकडे त्यांच्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने पैसे परत केले नाही. त्याने दिलेले दोन्ही धनादेश बँकेत न वटता परत आले होते. नंतर धिरेनने त्यांचा फोन घेणे बंद केला होता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बीकेसी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर धिरेन संपतविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.