ब्लॅकमेलसह खंडणीच्या गुन्ह्यांत तरुणीसह दोघांना अटक

मैत्रीपूर्ण संबंधाची धमकी देऊन ३७ लाख रुपये उकाळले

0

अरुण सावरटकर
२० डिसेंबर २०२४
मुंबई, – मैत्रीपूर्ण संबंधाची माहिती पत्नीसह इतरांना सांगून समाजात बदनामीची तसेच पत्नी व मुलाला जिवे मारण्याची धमकी देऊन गोरेगाव परिसरातील एका नामांकित कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणार्‍या ६० वर्षांच्या वयोवृद्धाला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी दुकलीस कांदिवली पोलिसांनी अटक केली. त्यात एका तरुणीचा समावेश आहे. शॉन रेमंड पायस ऊर्फ श्रीकांत शेट्टी आणि शीतल प्रशांत नायर अशी या दोघांची नावे आहेत. या गुन्ह्यांत स्नेहलता प्रशांत नायर ही महिला मुख्य आरोपी असून तिला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले. शीतल ही तिची मुलगी तर श्रीकांत तिचा प्रियकर असून या तिघांनी ब्लॅमेलसह खंडणीचा कट रचल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आतापर्यंत त्यांनी तक्रारदाराकडून सुमारे ३७ लाखांची खंडणी वसुली केली आहे. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

यातील तक्रारदार कांदिवली परिसरात त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत राहतात. गोरेगाव येथे एका नामांकित खाजगी कंपनीत ते वरिष्ठ अधिकारी म्हणून कामाला आहेत. त्यांच्याच इमारतीमध्ये स्नेहलता ही तिची मुलगी शीतलसोबत राहते. तिचे तिच्या पतीसोबत सतत वाद होत असल्याने पतीने तिला सोडून दिले होते. एकाच इमारतीमध्ये राहत असल्याने त्यांची चांगली ओळख होती. या ओळखीतून तिची आर्थिक अडचण समजून त्यांनी तिला पैशांची मदत केली होती. ती अधूनमधून घरातील अडचणी आणि मुलीच्या शिक्षणासाठी त्यांच्याकडे पैशांची मागणी करत होती. त्यामुळे ते तिला दरमाह पाच हजार रुपये देत होते. काही दिवसांनी ती त्यांच्याकडून आणखीन पैशांची मागणी करु लागली. त्यामुळे त्यांनी तिला आर्थिक मदत करण्याचे बंद केले होते. या घटनेनंतर तिने त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध त्यांच्या पत्नीसह इतरांना सांगून त्यांची समाजात बदनामीची धमकी देऊ लागली. बदनामीच्या भीतीने त्यांनी तिला पुन्हा पैशांची मदत सुरु केली होती. याच दरम्यान तिने त्यांच्याकडे फ्लॅटसाठी पैशांची मागणी सुरु केली होती. त्यांनी तिला दरमाह एक ते दिड लाख रुपये द्यावे यासाठी ती त्यांना सतत धमकी देत होती. बदनामीच्या भीतीपोटी ते तिला दर महिन्याला एक लाख रुपये देत होते.

२३ ऑगस्ट २०२४ रोजी ते दिल्लीला जात होते. यावेळी त्यांना श्रीकांत शेट्टी नावाच्या एका व्यक्तीने कॉल करुन शिवीगाळ केली होती. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. या व्यक्तीने त्यांना कांदिवली येथे भेटायला बोलाविले होते. त्यामुळे ते त्याला भेटायला कांदिवली येथे आले होते. तिथेच त्याची श्रीकांत शेट्टीशी भेट झाली. या भेटीत त्याने स्नेहलताने त्याच्या वडिलांकडून ५० लाख रुपये घेतले आहे. ते पैसे त्याला त्यांनी द्यावे असे सांगून त्यांच्यासमोरच स्नेहलताला कॉल लावला होता. यावेळी स्नेहलताने पैसे घेतल्याची कबुली घेताना त्यांना पैशांची व्यवस्था करुन त्याला ५० लाख रुपये देण्यास सांगितले. यावेळी त्यांनी त्यांच्याकडे ५० लाख रुपये नसल्याचे सांगितले असता श्रीकांतने त्यांना घातक शस्त्रांचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांचा मोबाईल आणि वॉलेटमधील पैसे काढून घेतले. काही वेळानंतर त्यांनी त्याला बँकेतून सुमारे सहा लाख रुपये काढून दिले. त्यानंतर तो त्यांच्याकडे आणखीन पाच लाखांची मागणी करु लागला. त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्याने त्यांच्याकडील सोन्याची अंगठी, चैन काढून घेतली. इतकेच नव्हे मुलाच्या शिक्षणासाठी ठेवलेले पाच लाख रुपयेही दिले. त्यानंतर तो त्यांना क्रोमा शॉपमध्ये घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर त्याने त्यांच्या क्रेडिट कार्डवरुन १ लाख ८८ हजार ७०० रुपयांचा आयफोन १५ प्रो मॅक्स मोबाईल घेतला. दर महिन्याला पाच लाख रुपये दिले नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी देऊन त्याने त्यांना सोडून दिले.

याबाबत स्नेहलताशी चर्चा केल्यानंतर तिने त्यांना श्रीकांत हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याला पैसे दिले नाहीतर परिणाम वाईट होतील अशी भीती दाखविली होती. त्यामुळे त्यांनी त्याला सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यांत प्रत्येकी पाचप्रमाणे वीस लाख रुपये दिले होते. १० डिसेंबरला श्रीकांतने त्यांना त्याच्या घरी आणले होते. तिथे त्याने त्यांना त्याच्याविरुद्ध हाफ मर्डरची केस झाली आहे. या गुन्ह्यांत पोलिसांशी सेंटलमेंटसाठी त्याला एक कोटीची गरज आहे. त्यामुळे त्यांनी त्याला एक कोटीची व्यवस्था करुन द्यावी असे सांगितले. पैसे दिले नाहीतर त्यांच्या पत्नीला स्नेहलतासोबत त्यांच्या मैत्रीपूर्ण संबंधाची माहिती सांगून त्यांची बदनामी करण्याची धमकी दिली होती. यावेळी श्रीकांतने जबदस्तीने त्यांचे स्नेहलतासोबत काही फोटो काढले होते. दोन दिवसांत १ कोटी ४० लाख रुपये दे नाहीतर तुझा गेमच करतो अशी धमकी दिली. दुसर्‍या दिवशी स्नेहलता व तिची मुलगी शितलने त्यांना कॉल करुन पैशांची व्यवस्था करण्यास सांगितले. यावेळी त्यांनी शितलला ती श्रीकांतला ओळखते का अशी विचारणा केली असता तिने त्याला दोन वेळा भेटल्याचे सांगितले. याच दरम्यान सोशल मिडीयावर त्यांना श्रीकांतचा इंटाग्राम अकाऊंटची माहिती दिसली होती. ते अकाऊंट पाहिल्यानंतर त्याचे स्नेहलता आणि शितलसोबत काही फोटो होते. या फोटोवरुन ते तिघेही एकमेकांच्या चांगल्या परिचित असल्याचे दिसून आले.

या तिघांनीच कट रचून त्यांना ब्लॅकमेल करुन पैसे वसुलीची योजना बनविल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यानंतर त्यांनी हा प्रकार त्यांच्या पत्नी आणि मुलाला सांगितला. या तिघांनी आतापर्यत ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडून १ लाख ८८ हजार ७०० रुपयांचा आयफोन १५ प्रो मॅक्स मोबाईल आणि ३५ लाखांची कॅश असा सुमारे ३७ लाख उकाळल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी त्यांना धीर देत त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे त्यांनी कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शॉन पायस ऊर्फ श्रीकांत शेट्टी, स्नेहलता नायर व तिची मुलगी शितल नायर या तिघांविरुद्ध ३०९ (४), ३०८ (३), ३०८ (२), ३ (५) भारतीय न्याय सहिता अन्वये गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्यांचा तपास नंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत गिते यांच्याकडे सोपविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत गिते व त्यांच्या पथकाने शॉन पायस ऊर्फ श्रीकांत शेट्टी आणि शीतल नायर या दोघांना अटक केली. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. स्नेहलता या वयोवृद्ध व आजारी असल्याने तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात नाही. या गुन्ह्यांत तिला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून तिच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page