मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ जुलै २०२४
मुंबई, – मृत सफाई कर्मचार्याची पत्नी असल्याचे भासवून अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळविताना बोगस कागदपत्रे सादर करुन महानगरपालिकेची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गीता जगदीश सोलंकी ऊर्फ गीता शामजी कतारिया या ४० वर्षांच्या महिलेविरुद्ध भांडुप पोलिसांनी बोगस दस्तावेज सादर करुन मनपाची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोकरीसाठी तिने बोगस रेशनकार्डसह अस्तित्वात नसलेल्या मुलीचा जन्मदाखला प्रमाणपत्र सादर केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
सायली सुरेश खेडेकर या ठाणे येथे राहत असून भांडुपच्या एस वॉर्ड महानगरपालिकेत आस्थापना विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून कामाला आहेत. १९९० साली त्यांच्या एस वॉर्डमध्ये जगदीश काला सोलंकी हा सफाई कर्मचारी म्हणून कामाला होता. २००८ साली त्याचे निधन झाले, त्यामुळे त्याच्या जागी त्याची पत्नी गीता सोलंकी हिने अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी यासाठी अर्ज केला होता. या अर्जासोबत तिने तिच्या पतीचे मृत्यूचा दाखला, रेशनकार्ड, कामातील वेतनपावती, ओळखपत्र, मृत्यू व वारस प्रमाणपत्रबाबत, तसेच गिता सोलंकी हिने तिचा शाळा सोडल्याचा दाखला, पुर्नविवाहानंतर सोलंकी कुटुंबियांचे पालनपोषण करण्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर केले होते. ५ नोव्हेंबर २०१२ रोजी तिला जगदीश यांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर नोकरीवर ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. तेव्हापासून गिता ही सफाई कर्मचारी म्हणून एस वॉर्डमध्ये कार्यरत होती. २८ जानेवारी २०१५ रोजी जगदीशची बहिण गीता डोडीया हिने जगदीशने गितासोबत विवाह केला नसल्याचा दावा करुन गिताने अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळविण्यासाठी बोगस दस्तावेज सादर करुन फसवणुक केल्याचा आरोप केला होता.
या तक्रार अर्जाची वरिष्ठ पालिका अधिकार्यांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीत गिताने सादर केलेले रेशनकार्ड बोगस होते. तिला मुलगी नसताना तिने तिला मुलगी असल्याचे बोगस जन्मदाखला प्रमाणपत्र सादर केले होते. चौकशीत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गिताला सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर मनपाच्या वतीने सायली खेडेकर यांनी भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर गिता सोलंकी ऊर्फ गिता कतारिया हिच्याविरुद्ध ३१८ (४), ३१९ (२), ३३६ (२), ३३६ (३), ३३८, ३४० (१), (२०) भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत तपास सुरु असून गिताची पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. या चौकशीनंतर तिच्यावर अटकेची कारवाई केली जाईल. या गुन्ह्यांत तिला बोगस दस्तावेज बनवून कोणी मदत केली याचाही पोलिसांकडून तपास सुरु आहे.