३१ लाख रुपये घेऊन बीएमडब्ल्यू कारची डिलीव्हरी नाही
व्यावसायिकाची फसवणुक केल्याप्रकरणी मित्राविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – बीएमडब्ल्यू कारसाठी घेतलेल्या सुमारे ३१ लाखांचा अपहार करुन एका डिजीटल मार्केटींग व्यावसायिकाची त्याच्याच मित्राने फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी व्यावसायिकाच्या तक्रार अर्जावरुन आरोपी मित्र फहीद कादरी याच्याविरुद्ध वांद्रे पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांत त्याची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या कारचा त्याने इतर काही लोकांसोबत व्यवहार केला होता का याचा पोलीस तपास करत आहेत.
डिजीटल मार्केटिंगचा व्यवसाय असलेले आसिफ उमर रिझवी हे वांद्रे परिसरात राहतात. त्यांचा फहीद बालमित्र असून तो वांद्रे येथील पेरी क्रॉस रोड परिसरात राहतो. दोन वर्षांपूर्वी त्यांनी त्याला त्याच्या वैयक्तिक कामासाठी अकरा लाख रुपये दिले होते. हा संपूर्ण व्यवहार ऑनलाईन झाला होता. या कालावधीत त्याने त्यांना पैसे परत केले नाही. मात्र फेब्रुवारी २०२३ रोजी त्याने त्यांना एक बीएमडब्ल्यू कार दाखविली होती. ही कार त्याच्या मालकीची असून ती त्याला ३१ लाखांना विक्री करायची आहे असे सांगितले. कार पाहताच क्षणी त्यांना आवडली होती. त्यामुळे त्यांनी ती कार फहीदकडून खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. फहीदने त्यांनी अकरा लाख रुपये दिले होते, त्यामुळे उर्वरित वीस लाख रुपये देण्याचे ठरले होते. फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांनी त्याला ऑनलाईन वीस लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. पेमेंट झाल्यानंतर पॉलिश तसेच किरकोळ दुरुस्ती करुन दोन ते तीन दिवसांत कारची डिलीव्हरी देण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र दिलेल्या मुदतीत त्याने कारची डिलीव्हरी केली नाही. वारंवार विचारणा करुनही त्याच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. जुलै २०२३ रोजी त्यांना ही कार फहीदने त्याच्या मित्राकडून २७ लाखांमध्ये विकत घेतली होती. या कारचे बोगस कागदपत्रे बनवून त्याने तीच कार त्यांना विक्री करण्याचा प्रयत्न केला. कारसाठी ३१ लाख रुपये घेऊन कारची डिलीव्हरी न करता त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी फहीद कादरीविरुद्ध वांद्रे पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.