मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ जुलै २०२४
मुंबई, – गॅगरेप करुन एका तरुणीची हत्या केल्याचा आरोप करुन एका महिलेची तोतया सीबीआय अधिकार्याने ऑनलाईन फसवणुक केल्याचा प्रकार दहिसर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तोतया सीबीआय अधिकार्याविरुद्ध दहिसर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. आरोपीच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
तक्रारदार महिला ही तिच्या पती आणि मुलासोबत दहिसर येथे राहते. तिचा मुलगा एका खाजगी कंपनीत कामाला आहे. २ मेला तिला अज्ञात व्यक्तीने फोन करुन तो वांद्रे येथील सीबीआय कार्यालयातून बोलत आहे. तिच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. चार ते पाच महिन्यांपूर्वी तिच्या मुलासह त्याच्या मित्रांनी एका तरुणीवर गॅगरेप केला होता. या गॅगरेपनंतर या तरुणीची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तो त्याच्या वाचविण्यासाठी आला होता. ही बातमी अद्याप मिडीयाला देण्यात आली नाही. अटकेची कारवाई तसेच मिडीयाला ही बातमी न देण्यासाठी त्याने तिच्याकडे पैशांची मागणी केली होती. पैसे दिले नाहीतर तिच्या मुलासह त्याच्या मित्रांविरुद्ध अटकेची कारवाई केली जाईल अशी धमकीच त्याने दिली होती. यावेळी तिला काही मुलांचा रडण्याचा आवाज ऐकू आला होता. त्यामुळे ती प्रचंड घाबरली होती. तिने त्याला पैसे देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर त्याने तिला एका बँक खात्याची माहिती दिली होती. याच बँक खात्यात तिने त्याला सव्वालाख रुपये पाठविले होते. त्यानंतर संबंधित तोतया अधिकारी तिला सतत फोन करुन आणखीन पैशांची मागणी करत होता. त्यामुळे तिने तिच्या मुलाला फोन करुन तो कुठे आहे याबाबत विचारणा केली. यावेळी त्याने तो त्याच्या कार्यालयात असल्याचे सांगितले.
घडलेला प्रकार तिने तिच्या मुलाला सांगितला. यावेळी त्याने तिची कोणीतरी सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करुन फसवणुक केल्याचे सांगितले. त्यामुळे तिने घडलेला प्रकार दहिसर पोलिसांना सांगून तिथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तोतया सीबीआय अधिकार्याविरुद्ध तोतयागिरी करुन फसवणुक करणे आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या मोबाईलसह संबंधित बँक खात्याची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. या माहितीवरुन आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे.