बोगस पासपोर्ट बाळगल्याप्रकरणी बांगलादेशी नागरिकाला अटक
वीस वर्षांपूर्वी भारतात आला; अकरा वर्ष कतार येथे नोकरी केली
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ जून २०२४
मुंबई, – उत्तरप्रदेशात अनधिकृतपणे वास्तव्यास असताना बोगस भारतीय दस्तावेज बनवून पासपोर्ट मिळविणार्या एका बांगलादेशी नागरिकाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकार्यांनी ताब्यात घेऊन सहार पोलिसांच्या स्वाधीन केले. पलासकुमार सुवासचंद्रो बिस्वास असे या ३३ वर्षांच्या बांगलादेशी प्रवाशाचे नाव असून त्याच्याविरुद्ध भादवीच्या विविध कलमातर्ंगत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. वीस वर्षांपूर्वी पालसकुमार हा बांगलादेशातून भारतात पळून आला होता, त्यानंतर बोगस भारतीय पासपोर्टवर तो अकरा वर्ष कतार येथे नोकरी करुन भारतात परत आल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
सोमवारी रात्री उशिरा अडीचच्या सुमारास पलासकुमार हा इमिग्रेशन तपासणीसाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. तो कतारच्या दोहा येथून मुंबईत आला होता. त्याच्याकडील पासपोर्टची पाहणी करताना त्याच्या बोली भाषेवरुन तो बांगलादेशी नागरिक असल्याचा संशय इमिग्रेशन अधिकार्यांना आला होता. त्यामुळे त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीदरम्यान त्याने तो बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली होती. २००४ साली त्याने एका एजंटच्या मदतीने बांगलादेशातून भारतात प्रवेश केला होता. उत्तरप्रदेशात वास्तव्यास असताना त्याने बोगस पॅनकार्ड, आधारकार्डसह इतर भारतीय दस्तावेज बनवून घेतले. या दस्तावेजाच्या मदतीने त्याने लखनऊ पासपोर्ट कार्यालयातून भारतीय पासपोर्ट मिळविले होते. त्यानंतर ५ नोव्हेंबर २०१३ साली कतार येथील दोहा शहरात नोकरीसाठी गेला होता. पासपोर्टची मुदत संपल्यानंतर त्याने दोहा येथे पासपोर्टचे नूतनीकरण केले होते. जवळपास अकरा वर्ष तिथे काम केल्यानंतर तो सोमवारी २४ जूनला रात्री उशिरा कतार येथून मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. मात्र त्याच्या बोली भाषेवरुन तो बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले आणि त्याला इमिग्रेशन अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. बोगस भारतीय दस्तावेजासह पासपोर्ट बाळगल्याप्रकरणी त्याला नंतर सहार पोलिसांकडे पुढील चौकशीसाठी ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी दिलीपसिंह जकशीजी ठाकूर यांच्या तक्रारीवरुन सहार पोलिसांनी पलासकुमारविरुद्ध ४२०, ४६५, ४६८, ४७१ भादवीसह १२ पासपोर्ट अधिनियिम सहकलम १४ अ, १४ ब विदेशी व्यक्ती अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला भारतात आल्यानंतर बोगस दस्तावेजासह पासपोर्ट मिळविण्यात मदत करणार्या एजंटचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.