बोलबच्चन करुन दागिने पळविणार्‍या रेकॉर्डवरील आरोपीला अटक

आरोपीविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात फसवणुकीचे 59 गुन्हे दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
6 एप्रिल 2026
मुंबई, – रस्त्यावरुन जाणार्‍या पादचार्‍यांना विशेषता वयोवृद्धांना बोलबच्चन करुन तो त्याच्या परिचित असल्याचे सांगून त्यांच्याकडील सोन्याचे दागिन्यासह इतर मौल्यवान वस्तू चोरी करुन पळून जाणार्‍या एका रेकॉर्डवरील आरोपीस भोईवाडा पोलिसांनी अटक केली. नरेश ऊर्फ नर्‍या विजयकुमार जयस्वाल असे या 40 वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात बोलबच्चन करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

71 वर्षांचे तक्रारदार वयोवृद्ध जोसेफ सी. ए फर्नाडिस हे परळ येथे राहत असून ते एका खाजगी कंत्राटदाराकडे इलेक्ट्रीशियन म्हणून काम करत होते. 30 मार्चला ते घरातील सामान आणण्यासाठी मार्केटमध्ये जात होते. गौरीशंकर मिठाई दुकानासमोरुन जात असताना त्यांच्याकडे दोन तरुण आले, त्यांनी त्यांना तू राजूचा भाऊ आहे ना अशी विचारणा करुन संभाषण करण्यास सुरुवात केली होती. बोलबच्वन करुन त्यांनी त्यांना त्यांची सोन्याची चैन काढण्यास सांगून ती चैन पिशवीत ठेवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी चैन काढून पिशवीत ठेवल्याचे भासविले होते. काही वेळानंतर ते दोघेही पळू लागले.

हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी पिशवीतील चैन काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पिशवीत चैन नव्हती. या दोघांनी बोलबच्चन करुन त्यांची एक लाखांची बारा ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करुन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पळून जाणार्‍या गणेश दशरथ बारकडे याला स्थानिक लोकांनी पकडले तर त्याचा दुसरा सहकारी पळून गेला. गणेशला नंतर स्थानिक रहिवाशांनी भोईवाडा पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी जोसेफ फर्नाडिस यांच्या तक्रारीवरुन भोईवाडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

याच गुन्ह्यांत गणेश बारकडे याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या चौकशीत या गुन्ह्यांत नरेश जयस्वाल याचा सहभाग उघडकीस आला होता. त्यामुळे त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना तो कल्याण येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त धनश्याम पंतगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ठाकूर, पोलीस निरीक्षक महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन बोरसे, पोलीस हवालदार नितीन धंगेकर, महादेव माळी, पोलीस शिपाई हेमंत सुळे, संदीप भरसट यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती.

यावेळी घटनास्थळी आलेल्या नरेश जयस्वाल याला पोलिसांनी अटक केली. तपासात नरेश हा अशा गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात 59 गुन्हे दाखल आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page