बॉम्बस्फोटाने आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवून देण्याची धमकी
गुन्हा दाखल होण्यापूर्वीच कॉल करणार्या आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
27 मे 2025
मुंबई, – बॉम्बस्फोटाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मंगळवारी दुपारी दोनपर्यंत उडवून देण्याची धमकी एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला दिल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होण्यापूर्वी कॉल करणार्या आरोपीच्या मुसक्या एमआयडीसी पोलिसांनी आवळल्या. मनजीतकुमार गौतम असे या 35 वर्षीय आरोपीचे नाव असून तो साकिनाका येथील रहिवाशी आहे. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. कौटुंबिक वादातून आलेल्या नैराश्यातून त्याने धमकीचा कॉल केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
मंगळवारी सकाळी नऊ वाजता मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला एका अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरुन कॉल केला होता. या व्यक्तीने मंगळवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर त्याने कॉल बंद केला होता. ही माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर त्याची पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी गंभीर दखल घेतली होती. कॉल करणार्या व्यक्तीची माहिती काढून त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तपासात ज्या मोबाईलवरुन हा कॉल आला होता, त्या मोबाईलचे लोकेशन साकिनाका परिसरात असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे ही माहिती नंतर एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली होती.
पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत भोसले, पोलीस निरीक्षक महेश गुरव, प्रणय काटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव, पोलीस उपनिरीक्षक आनंदराव काशिद, पोलीस हवालदार बडे, पोलीस शिपाई जाधव, लोखंडे, अवघडे, शिंगाने, शिंदे, पोलीस हवालदार पिसाळ यांनी तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी मनजीतकुमार गौतम या संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीदरम्यान त्यानेच मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला कॉल करुन ही धमकी दिल्याची कबुली दिली. मनजीतकुमार हा साकिनाका येथील दुर्गा माता मंदिराजवळील खैरानी रोड परिसरात राहत असून त्याचे त्याच्या पत्नीसोबत कौटुंबिक वाद होता. याच वादातून त्याला प्रचंड मानसिक नैराश्य आले होते. त्यातून त्याने कंट्रोल रुमला कॉल करुन आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी दिली होती. या कबुलीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. बुधवारी दुपारी त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.