मानवी बॉम्बसह आरडीएक्सने बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी

बॉम्बस्फोटात एक कोटीहून लोकांना मारण्याचा केला दावा

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 सप्टेंबर 2025
मुंबई, – शनिवारी होणार्‍या गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, विसर्जनाला कुठेही गालबोट लागू नये म्हणून मुंबई पोलीस सज्ज असताना गुरुवारी सायंकाळी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या कंट्रोल रुमला संपूर्ण मुंबई शहरात बॉम्बस्फोट घडविण्यात येणार असल्याची धमकी प्राप्त झाली आहे. मानवी बॉम्बसह 400 किलो आरडीएक्सने मुंबई शहरात बॉम्बस्फोट घडविण्यात येणार असून त्यासाठी काही अतिरेकी मुंबईत दाखल झाल्याचा दावा या मॅसेजमध्ये करण्यात आला आहे. बॉम्बस्फोटात एक कोटीपेक्षा अधिक लोकांना मारण्याचा दावा करण्यात आला आहे. या धमकीनंतर मुंबईतील सुरक्षेत प्रचंड वाढ करण्यात आली असून सर्वत्र गस्त वाढविण्यासह नाकाबंदी करण्याचे आदेश वरिष्ठांकडून सर्वच पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहे. दरम्यान अज्ञात व्यक्तीविरुद्ध वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन या आरोपीचा शोध सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेसह सायबर सेलकडून संमातर तपास सुरु आहे. मोबाईल क्रमांकावरुन आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

वरळी येथे वाहतूक पोलिसांचे कंट्रोल रुम असून या कंट्रोल रुमला गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता एका अज्ञात व्यक्तीने व्हॉटअपच्या माध्यमातून मॅसेज केला होता. या मॅसेजमध्ये अज्ञात व्यक्तीने 34 गाड्यांमध्ये आत्मघाती अतिरेकी मुंबई शहरात घुसले असून ते संपूर्ण शहरात बॉम्बस्फोटाची मालिका घडविणार आहे. लष्कर-ए-जिहादी या संघटनेचा उल्लेख करुन या व्यक्तीने बॉम्बस्फोट रोखता येईल तर रोखून दाखवा. कारण आम्ही जागोजागाी बॉम्बस्फोट घडविणार आहोत. त्यापैकी एका अतिरेक्याचे नाव फिरोज असून त्याच्यासोबत इतर चौदा अतिरेकी मुंबई शहरात घुसले आहे. त्यांच्याकडे 400 किलो आरडीएक्स असून या आरडीएक्सच्या मदतीने संपूर्ण मुंबई शहराला उडविण्यात येणार आहे. या बॉम्बस्फोटात किमान एक कोटीपेक्षा अधिक लोकांना मारण्याचा त्यांचा टार्गेट असल्याचे नमूद केले होते. या धमकीच्या मॅसेजची माहिती नंतर वरिष्ठांना देण्यात आली होती.

शनिवारी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र गणपती विसर्जन असल्याने शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आत्मघाती अतिरेकर्‍यासह इतर अतिरेकी मुंबईत घुसल्याची तसेच 400 किलो आरडीएक्सने संपूर्ण मुंबई शहरात बॉम्बस्फोटाची मालिका घडविण्यात येणार असल्याच्या धमकीची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी गंभीर दखल घेत संपूर्ण पोलीस दलाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. ज्या मोबाईल क्रमाकावरुन हा धमकीचा मॅसेज पाठविण्यात आला, त्या मोबाईलची सीडीआरसह इतर माहिती काढण्याचे काम सुरु आहे.

कोणीतरी खोडसाळ म्हणून संबंधित धमकीचा मॅसेज पाठवून शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न सुरु केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तरीही पोलीस आयुक्तांनी सर्वच पोलीस ठाण्यात सतर्क राहून जास्तीत जास्त गस्त घाला, नाकाबंदी करा, संशयित व्यक्तींची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बंदोबस्तात हलगर्जीपणा करु नका. तसा प्रकार आढळून आल्यास संबंधित पोलिसांवर सक्त कारवाई केली जाईल असे वरिष्ठांकडून ताकिद देण्यात आली आहे. दरम्यान या घटनेनंतर वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध धमकीचा मॅसेज पाठवून सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा वरळी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेसह सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page