मुंबईसह देशभरात बॉम्बस्फोट धमकीच्या ई-मेलने खळबळ

सर्वच प्रमुख शहरात सतर्कचा इशारा; सायबर सेलकडून तपास सुरु

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
13 मे 2025
मुंबई, – येत्या तीन दिवसांत मुंबईसह राज्यात तसेच देशभरात कुठल्याही क्षणी बॉम्बस्फोट होण्याची शक्यता असून सतर्क रहा असा धमकीवजा ई-मेल सोमवारी सकाळी राज्य पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या धमकीच्या मेलची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत मुंबईसह देशभरातील सर्व प्रमुख शहरात सतर्कचा इशारा दिला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच सायबर सेल पोलिसांनी तपास सुरु केला असून हा मेल कोणी आणि कोठून पाठविला याचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुंबई शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी योग्य ती काळजी घेतली असून मुंबईकरांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सतर्क राहून मुंबई पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

कुलाबा येथे राज्य मुख्यालयात मुख्य नियंत्रण कक्ष असून या कक्षाच्या ईमेल आयडीवर सोमवारी सकाळी पावणेअकरा वाजता ममता बोरसे या महिलेच्या नावाने एक मेल आला होता. त्यात संबंधित व्यक्तीने मी तुम्हाला विनंती करतो की, आज, उद्या किंवा परवा जर एका मोठ्या बॉम्बस्फोट होणार असून सावध रहा. ते बॉम्बस्फोट कुठे आणि केव्हा घडेल हे शोधण्यासाठी तुमच्याकडे आता वेळ नाही. पण ती वेळ जवळच आली आहे. कृपया आपल्या राज्यात किंवा देशात कुठेही शक्य असल्यास ते दुर्लक्ष करु नका असे मॅसेजमध्ये धमकीवजा इशारा देण्यात आला.

ही माहिती नंतर वरिष्ठ अधिकार्‍यांना देण्यात आली होती. या मेलची गृहविभागाने गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त देवेन भारती यांना तपासाचे आदेश दिले आहे. या आदेशानंतर सायबर सेलसह राज्य एटीएस आणि गुन्हे शाखेला तपासाचे आदेश देण्यात आले आहे. हा मेल कोठून आला, तो कोणी पाठविला, मेल पाठविण्यामागे संबंधित व्यक्तीचा काय उद्देश होता याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

दरम्यान या धमकीनंतर मुंबई शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून योग्य ती खरबदारी घेण्यात आली आहे. परिसरात जास्तीत जास्त गस्त घाला, नाकाबंदी करा. संशयित व्यक्तींची कसून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. शहरातील संवदेनशील आणि अतिसंवेदनशील परिसरातील बंदोबस्त वाढविण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. मेलची चौकशी करणार्‍या सायबर सेलला महत्त्वाची माहिती प्राप्त झाली आहे. संशयित आरोपीच्या अटकेसाठी काही विशेष पथक मुंबईबाहेर पाठविण्यात आले आहे. लवकरच या आरोपीला अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page